Chat GPT द्वारे मिळवा हव्या त्या प्रकारे माहिती | पुढारी

Chat GPT द्वारे मिळवा हव्या त्या प्रकारे माहिती

नवी दिल्ली : कल्पना करा तुम्हाला एखादा लेख झटपट हवा आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे अगदी अल्प वेळ आहे. अशावेळी कोणतीही माहिती शोधण्यासाठी उपलब्ध असलेला एकमेव पर्याय म्हणजे गुगल सर्च इंजिन. मात्र, गुगलकडून आपल्याला फक्त माहितीचा स्रोत मिळतो. जर तीच माहिती आपल्याला हव्या त्या प्रकारात देणारे दुसरे एखादे टूल मिळाले तर काय बहार येईल. वास्तवात आता हे शक्य झाले आहे. ( Chat GPT )

जसे की, तुम्हाला एका ठराविक विषयाची माहिती घेऊन त्याचे लेखात रूपांतर करायचे आहे. या निर्णायक क्षणी तुमच्या मदतीला धावेल चॅट जीपीटी. या टूलचा वापर करून तुम्ही मोजक्या वेळेत संबंधित लेख तयार करू शकता. हे टूल तयार केले आहे ओपन ए आय नामक कंपनीने. मुळात हा एआय प्रोग्रॅम एक चॅटबॉट असून तो तुमच्यासोबत संभाषण करतो. तुम्ही त्याला प्रश्न विचारता आणि तो तुम्हाला त्याची उत्तरे देतो.

एखाद्या विषयाशी संबंधित असलेला इंटरनेटवरील विविध ठिकाणचा मजकूर एकत्र करून हा प्रोग्रॅम तुम्हाला तो मुद्देसूद स्वरूपात सादर करतो. त्यासाठी https://chat.openai.com/chat या वेबसाईटवर जाऊन सर्वात आधी तुम्हाला तुमचे खाते उघडावे लागेल. त्यानंतर पुन्हा लॉगिन केल्यानंतर तुम्हाला याचा वापर कसा करावा याच्या काही सूचना दिसतील आणि नंतर खाली एक पट्टी दिसेल. यात तुम्हाला या चॅटबॉटला हवे ते प्रश्न विचारता येतील. त्यातून तुम्ही हवी ती माहिती मिळवू शकता.

एखाद्या आजारावर काय उपाय करावे, कोणती काळजी घ्यावी, ठराविक विषयावर लेख कसा लिहावा, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची संपूर्ण माहिती तुम्हाला काही क्षणांत मिळू शकते आणि तीसुद्धा एकाच ठिकाणी. हा चॅटबॉट ठराविक विषयावर विस्तृतपणे संशोधन करून माहिती पुरवू शकत नाही हेही तेवढेच खरे. सध्या त्याची तेवढी क्षमता नसली तरी भविष्यात या क्षमता त्याच्याकडे असतील यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

हेही वाचा : 

Back to top button