Meteorite : अमेरिकेतील सरोवरात कोसळली उल्का | पुढारी

Meteorite : अमेरिकेतील सरोवरात कोसळली उल्का

वॉशिंग्टन : अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर असलेल्या ओंटारियो सरोवराजवळ 19 नोव्हेंबरला रात्री 3 वाजता अचानक एक हिरव्या रंगाचा तीव्र प्रकाश दिसून आला होता. आकाशातून आलेला हा प्रकाश पाहून लोक भयचकीत झाले होते. विशेष म्हणजे या प्रकाशावेळी हेलिकॉप्टरसारखी एक वस्तूही पाहण्यात आली होती. सुमारे दहा सेकंदांनंतर हे द़ृश्य विरून गेले. आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे की, गेल्या महिन्यात या सरोवराजवळ एक छोटी उल्का ( Meteorite ) कोसळली होती व तिचाच हा प्रकाश होता.

Meteorite : तीन तास आधीच वैज्ञानिकांनी लावला होता छडा

वीज कोसळल्यासारखा हा प्रकार दिसून आला होता आणि त्यावेळी हिरवट रंगाचा प्रकाश निर्माण झाला होता. ही उल्का पृथ्वीवर कोसळण्याच्या तीन तास आधीच तिचा छडा वैज्ञानिकांनी लावला होता. पृथ्वीच्या वातावरणात येताच ती जळाली आणि तिचे शेकडो तुकडे झाले. यामधील बहुतांश तुकडे या सरोवरात व परिसरात कोसळले.

जगभरातील सात वेधशाळांनी हा उल्कापात रेकॉर्ड केलेला आहे. इतकेच नव्हे तर अमेरिका आणि कॅनडातील किमान 59 लोकांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली. ओंटारियोमधील एक प्रत्यक्षदर्शी डेरेक बोवेन यांनी ही घटना आपल्या गोप्रो कॅमेर्‍यात कैदही करून घेण्यात यश मिळवले. 30 सेकंदांच्या या व्हिडीओत ही उल्का कोसळत असताना व हिरवट रंगाचा प्रकाश निर्माण होत असताना दिसून येतो. टोरांटोजवळील 1815 फूट उंचीच्या सीएन टॉवरनेही ही घटना कॅमेर्‍यात टिपून घेतली आहे.

हेही वाचा : 

Back to top button