हृदयविकाराचा धोका टाळायचा आहे हा पदार्थ तुमच्या आहारात हवाच... - पुढारी

हृदयविकाराचा धोका टाळायचा आहे हा पदार्थ तुमच्या आहारात हवाच...

टोकियो : शेंगदाणे खाणार्‍या आशियाई लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी असतो असे दिसून आले आहे. जपानच्या ओसाका युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचा दावा केला आहे. जपानमध्ये राहणार्‍या ज्या आशियाई स्त्री-पुरुषांना रोज चार-पाच शेंगदाणे खाण्याची सवय होती त्यांच्यामध्ये इस्केमिक स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका घटला असल्याचे दिसून आले.

‘स्ट्रोक’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. जे लोक शेंगदाणे खातात त्यांच्यामध्ये असे आजार कितपत असतात याबाबतची एक पाहणी करण्यात आली. संशोधक सतोयो केहारा यांनी सांगितले की जे लोक शेंगदाणे अधिक खातात त्यांच्यामध्ये इस्केमिक स्ट्रोकचा धोका कमी असतो.

शेंगदाण्यांना आहारात समाविष्ट करणे लाभदायक ठरते. याबाबत दोनवेळा पाहणी करण्यात आली होती.

पहिली पाहणी 1995 मध्ये तर दुसरी पाहणी 1998 ते 1999 या काळात झाली. यामध्ये 74 हजार आशियाई महिला व पुरुषांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांचे वय सरासरी 45 ते 74 वर्षे होते.

अमेरिकन हार्ट असोसिएशनने म्हटले आहे की आठवड्यातून पाचवेळा दोन टेबल स्पून शेंगदाणे खावेत.

अर्थातच हे शेंगदाणे खारवलेले म्हणजे मीठ लावलेले नसावेत. शेंगदाण्यांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड, पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड, खजिने, जीवनसत्त्वे आणि फायबर हे पोषक घटक असतात. मधुमेह, कर्करोग अशा गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासाठीही शेंगदाणे उपयुक्त आहेत.

Back to top button