विज्ञान व तंत्रज्ञान : ध्वनीपेक्षा तिप्पट अधिक गतीने उडणारे विमान | पुढारी

विज्ञान व तंत्रज्ञान : ध्वनीपेक्षा तिप्पट अधिक गतीने उडणारे विमान

पुढारी ऑनलाइन डेस्क: विज्ञान व तंत्रज्ञान : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सध्या मानवाला थक्क करणारी प्रगती करून दाखवली आहे. एके काळी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी चार-पाच दिवसांचाही प्रवास करावा लागत असे. आता केवळ दोन तासांत असा प्रवास होतो. आता तर रेल्वे व विमाने अधिकाधिक वेगवान बनवली जात आहेत. सध्या एक असे विमान विकसित केले जात आहे जे ध्वनीच्या गतीपेक्षाही तिप्पट अधिक गतीने उड्डाण करील. त्याला ‘सुपरसोनिक’ विमान म्हटले जाते. हे विमान अणुऊर्जेवर चालेल.

विज्ञान व तंत्रज्ञान : स्पेनचे डिझायनर ऑस्कर विनाल्स यांनी म्हटले आहे की सध्या असे विमान बनवण्याची योजना सुरू आहे जे लंडनपासून न्यूयॉर्कपर्यंतचे सुमारे पाच हजार किलोमीटरचे अंतर केवळ 80 मिनिटांमध्येच पार करील. भविष्यात सुमारे 170 प्रवासी या ध्वनीपेक्षाही तिप्पट अधिक वेगवान असलेल्या विमानातून प्रवास करू शकतील. काही मिनिटांमध्येच पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाला पोहोचवणारे हे विमान असेल. हे विमान बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला ‘हायपर स्टिंग’ असे नाव देण्यात आले आहे. हे विमान कोल्ड फ्युजन न्यूक्लियर रिअ‍ॅक्टरच्या मदतीने संचालित केले जाईल.

विज्ञान व तंत्रज्ञान : आतापर्यंत केवळ क्षेपणास्त्र किंवा लष्करी उपकरणांमध्ये अणुशक्तीचा वापर करण्यात आलेला आहे. आता लवकरच प्रवासी विमानांमध्येही हे तंत्र वापरले जाईल. या विमानात रॅमजेट इंजिन आणि नेक्स्ट जेन हायब्रीड टर्बोजेटची पॉवर दिली जाईल. हायपर स्टिंग विमानाची लांबी तीनशे फुटांपेक्षाही जास्त असेल. त्याच्या एका पंखापासून दुसर्‍या पंखापर्यंतची रुंदी दीडशे फुटांपेक्षा अधिक असेल.

हे ही वाचा:

मंगळावर मिळाले द्रवरूप पाण्याचे संकेत

Amazing Photograph : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने गुरू ग्रहाचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट चित्र टिपले आहे

Back to top button