मंगळावर मिळाले द्रवरूप पाण्याचे संकेत | पुढारी

मंगळावर मिळाले द्रवरूप पाण्याचे संकेत

लंडन, वृत्तसंस्था : एकेकाळी पृथ्वीच्या शेजारच्या मंगळ ग्रहावरही वाहते पाणी होते, हे आता सिद्ध झालेले आहे. कालौघात मंगळ ग्रह कोरडा पडला, असे मानले जात असले; तरी आता एका नव्या संशोधनातून मंगळावर द्रवरूप पाणी आजही अस्तित्वात असू शकते, याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी रडारशिवाय अन्य साधनांचा यासाठी वापर केला. मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या टोपीखाली द्रवरूप पाणी असू शकते, असे संशोधकांना वाटते. चंद्रानंतर आता मंगळावरच जगभरातील खगोल शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रित केले असल्याने हे संशोधन महत्त्वाचे ठरले आहे. शेफील्ड युनिव्हर्सिटीच्या डॉ. फ्रान्सिस बुचर यांनी सांगितले की, हे संशोधन मंगळभूमीवर द्रवरूप पाण्याच्या अस्तित्वाचे आतापर्यंतचे सर्वात चांगले संकेत देणारे आहे.

पृथ्वीवर सबग्लेशियल सरोवरे (अशी सरोवरे जी ग्लेशियर किंवा बर्फाच्या चादरीखाली अस्तित्वात असतात) शोधत असताना आम्ही ज्या पुराव्यांकडे लक्ष देतो त्यापैकी दोन प्रमुख पुरावे मंगळावरही आढळले आहेत. द्रवरूप पाणी हे जीवसृष्टीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. अर्थात, याचा अर्थ असा नाही की, मंगळावर जीवसृष्टी आहे. बुचर यांनी सांगितले की, अतिशय कमी तापमानातही जर दक्षिण ध्रुवाच्या बर्फाखाली द्रवरूप पाणी असेल, तर हे पाणी कदाचित खारे पाणी असेल आणि त्यामध्ये सूक्ष्म जीव तग धरून राहणे कठीण आहे.

भूतकाळात मात्र मंगळावर राहण्यास अधिक योग्य असे वातावरण व परिस्थिती होती. संशोधकांच्या या आंतरराष्ट्रीय टीममध्ये युनिव्हर्सिटी ऑफ नॅनटेस व युनिव्हर्सिटी कॉलेज डबलिनचेही वैज्ञानिक होते. त्यांनी मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील आईस कॅपच्या वरील पृष्ठभागाच्या तपासणीसाठी अंतराळयानाच्या लेसर-अल्टिमीटरचा वापर केला. मंगळावरील तापमान सरासरी उणे 62 अंश सेल्सिअस असते व ध्रुवीय भागात हिवाळ्यामध्ये ते उणे 140 अंश सेल्सिअसपर्यंतही घसरू शकते.

Back to top button