

भोपाळ : 'अरे चड्डी पहन के फुल खिला है' गाण्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात आपल्या प्राणीमित्रांबरोबर मौजमस्ती करणारा मोगली कुणीही विसरू शकत नाही. अर्थात टारझन, मोगलीसारखी पात्रे जंगलात राहत असल्याने ते कंबरेला काही तरी गुंडाळून तिथे तसेच राहू शकतात. मात्र, केवळ चड्डीच परिधान करून कुणी तरुण कॉलेजमध्ये जात असेल व त्याला तसेच येण्याची परवानगीही मिळत असेल याची आपण कल्पनाही करणार नाही. मध्य प्रदेशात एक असाच तरुण आहे जो केवळ चड्डी परिधान करून आणि अंगाभोवती टॉवेल लपेटूनच कॉलेजला जातो!
मध्य प्रदेशातील बडवानी येथे हा आधुनिक 'मोगली' आहे. या मुलग्याचे नाव आहे कन्हैया अवास्या. त्याला अगदी लहानपणापासूनच कपड्यांचा अतोनात तिटकारा आहे. लहानपणी त्याला आईने एखादा पोशाख घातला तर तो हे कपडे काढून टाकत असे किंवा चक्क फाडतही असे. केवळ चड्डी परिधान करूनच राहणे त्याला आवडे. त्यामुळे तो बाहेर जात असताना त्याच्या खांद्याभोवती केवळ एक टॉवेल गुंडाळला जात असे. अशाच स्थितीत त्याने शालेय शिक्षण घेतले. त्यासाठी खास जिल्हाधिकार्यांनी त्याला परवानगी दिली होती.
गेल्यावर्षी त्याने बडवानीच्या सरकारी कॉलेजमध्ये बी.ए.च्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. तिथेही तो असाच जातो आणि त्याला कुणीही त्रास देत नाही. त्याने आतापर्यंत परीक्षेत चांगले गुण मिळवले आहेत. तो मुका आहे की काय असे वाटण्याइतका तो मितभाषी आहे. घरी असेल त्यावेळी बकर्या चारण्यासाठी नेतो. जेवताना त्याला दूध आणि भाकरीच हवी असते. मिरची-मसाल्याचे तो खात नाही. सर्वसामान्य तरुणांसारखे त्याला समोसा, नूडल्स, मंच्युरियन वगैरे आवडत नाही.
जंगलातून कडुनिंबाच्या काड्या तोडून आणून त्यानेच दात स्वच्छ करतो. असे असले तरी तो सामान्य विद्यार्थ्यांसारखा कबड्डी खेळणे, कॉलेजमधील उपक्रमांमध्ये सहभागी होणे आणि अगदी बाईक चालवण्यासारख्या सर्व गोष्टीही करतो. त्याचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे. त्याला दोन बहिणी व एक भाऊ आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून तिच्या लग्नातही तो अशाच 'पोशाखा'त हजर होता. दुसरी बहीण नर्सिंगचे शिक्षण घेत असून भाऊही बी.ए. करीत आहे. मोठा भाऊ कॉलेजमध्ये जीन्स पँट-शर्ट परिधान करून जात असला तरी हा मात्र टॉवेल व चड्डीतच कॉलेजमध्ये जातो!
हेही वाचलंत का?