yawatmal news : रानडुकरांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, सैरभैर झालेल्या 28 मेंढ्यांचा नदीत बुडून मृत्यू | पुढारी

yawatmal news : रानडुकरांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, सैरभैर झालेल्या 28 मेंढ्यांचा नदीत बुडून मृत्यू

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : yawatmal news : रानडुकरांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. त्यामुळे सैरभैर झालेल्या मेंढ्या चोहोबाजूंनी पळत सुटल्या. या गडबडीत नदीत पडून २८ मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दारव्हा तालुक्यातील पाथ्रडदेवी शिवारात घडली.
दारव्हा तालुक्यातील ब्रह्मी येथील गुलाब सोमाजी शिंदे हे मेंढपाळ आहेत. त्यांच्या मालकीच्या मेंढ्या चारण्याकरिता ते पाथ्रडदेवी शिवारात गेले होते. त्यांनी आपल्या मेंढ्या धरणालगत चरण्यास सोडल्या होत्या. काही वेळानंतर ते मेंढ्यांना घेऊन पाणी पाजण्यासाठी नदी पात्रावर गेले होते. अचानक रानडुकरांचा एक कळप आला. त्यांनी मेंढ्यांवर हल्ला चढविला. यात मेंढ्या नदीतील खोल पाण्यात पडल्या. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर पाण्यात बुडून २८ मेंढ्यांचा मृत्यू झाला.
मेंढपाळ गुलाब शिंदे हे भूमिहीन आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या मेंढ्यावरच होता. आता त्याच मेंढ्या मृत पावल्यामुळे त्यांच्यावर संकट ओढावले आहे. शिंदे यांच्यावर बाहेरील कर्जही आहे. आता ते कसे फेडावे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यांना जगण्याचा कोणताही आधार नाही. २८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्यामुळे शिंदे यांचे जवळपास चार लाखांच्या वर नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी मेंढपाळ युवा मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष दादाराव महानर यांनी केली आहे.
हे ही वाचा :

Back to top button