पोटासंबंधीच्या समस्यांवर ‘हे’ आहेत गुणकारी पदार्थ… | पुढारी

पोटासंबंधीच्या समस्यांवर ‘हे’ आहेत गुणकारी पदार्थ...

नवी दिल्ली : सध्याच्या काळात केवळ वृद्धांमध्येच नव्हे तर लहान मुलांमध्येही बद्धकोष्ठतेची समस्या दिसून येऊ लागली आहे. बदलती जीवनशैली तसेच खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेस अशा पोटासंबंधीच्या समस्या वाढलेल्या आहेत. पोट साफ होत नसेल तर त्यामधून इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. बद्धकोष्ठता असेल तर जंकफूड व तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे. या समस्येवर काही पदार्थ गुणकारी ठरू शकतात. त्याची तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती…

बेदाणे : काळे बेदाणे किंवा मनुके हे बद्धकोष्ठतेवर लाभदायक मानले जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे पोटासाठी अतिशय गुणकारी आहे. बेदाण्यांमुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि पित्त अशा समस्या दूर होण्यास मदत होते. पाण्यात भिजवून बेदाणे खाणे हे अधिक लाभदायक ठरते.

गायीच्या दुधाचे तूप : बद्धकोष्ठतेवर गायीच्या दूधापासून बनवलेले तूपही गुणकारी असते. ते शरीराच्या चयापचय क्रियेला उत्तेजन देते आणि शरीरातील आरोग्यदायी फॅटस् टिकवून ठेवण्यासही मदत करते. गायीच्या तुपामुळे बद्धकोष्ठतेचा जुनाट विकारही दूर होण्यास मदत मिळते. मेथीच्या

बिया : पचनसंस्थेसाठी मेथी लाभदायक असते. रात्री चमचाभर मेथीच्या बिया भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने लाभ मिळतो. मेथीच्या बियांची पूड बनवून रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर चमचाभर घेणेही गुणकारी ठरते. अर्थात कोणतेही उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे योग्य ठरते.

आवळा : पचनसंस्थेसाठी आवळाही लाभदायक मानला जातो. आवळ्याचे फळ, पावडर किंवा ज्यूसही उपयुक्त ठरतो.

गायीचे दूध : गायीच्या दुधाचा लाभ आबालवृद्ध अशा सर्वांनाच होतो. रात्री झोपण्यापूर्वी पेलाभर गायीचे गरम दूध पिल्याने लाभ होऊ शकतो.

 

Back to top button