आता येणार ‘हरकाम्या’ रोबो! | पुढारी

आता येणार ‘हरकाम्या’ रोबो!

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना हा रोबो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजीचा आहे. रोबो तर आता प्रत्येक क्षेत्रात वापरले जात आहेत. अमेरिका आणि जपानसारखे देश तर हरेक नमुन्याचे रोबो बनवत आहेत. आता अमेरिकेत मानवाकृती ‘हरकाम्या’ रोबो विकसित करण्यात आला आहे. तो कोणतीही छोटी-मोठी कामे करू शकेल.

‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’सारख्या कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स डे’ निमित्त अशा रोबोच्या निर्मितीची घोषणा केली. त्यांची इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी ‘टेस्ला’च या रोबोची निर्मिती करीत आहे. हा ‘टेस्लाबॉट’ दैनंदिन घरगुती कामापासून ते कार दुरुस्तीच्या कामापर्यंत कोणतीही कामे करू शकेल.

मस्क यांनी सांगितले की,पुढील वर्षापर्यंत हरकाम्या रोबोचे प्रोटोटाईप तयार करण्यात येईल. हा रोबो ‘ऑप्टिमस’ कोडनेमनुसार तयार केला जात आहे. हे कोडनेम हॉलीवूडचा चित्रपट ‘ट्रान्स्फॉर्मर सीरिज’मधील बहुचर्चित व्यक्तिरेखेशी संबंधित आहे. या रोबोमध्ये आठ कॅमेरे असलेली ऑटो पायलट ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीमही असेल. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला हा रोबो माणसाचा मित्र व सहाय्यक बनेल.

अनेक शारीरिक कष्टाची कामे या रोबोवर सोपवून देता येऊ शकतील. कॅलिफोर्नियातील फ्रॅमोंट येथील कारखान्यात मस्क यांनी या रोबोचे सादरीकरण केले. हा रोबो 5.8 फूट उंच आणि सुमारे 57 किलो वजनाचा असेल. तो 68 किलो वजन उचलू शकेल. तसेच वीस किलो वजन घेऊन ताशी 8 किलोमीटर वेगाने धावूही शकेल.

Back to top button