60 मीटर साडीवर 13 भाषांमध्ये 32 हजार ‘जय श्रीराम’! | पुढारी

60 मीटर साडीवर 13 भाषांमध्ये 32 हजार ‘जय श्रीराम’!

हैदराबाद ः भारतीय संस्कृतीत रामनामाचे एक वेगळेच महत्त्व आहे. अनेक संतांनी रामनामाचा महिमा गायलेला आहे. अनेक भाविक रामनामाचा जप करण्याबरोबरच ते लिहून काढण्याची सेवाही करीत असतात. काही कलाकार तांदळावरही रामनाम लिहितात. आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथील एका विणकराने तर 60 मीटर लांब आणि 44 इंच रुंद रेशमी साडी बनवून तिच्यावर राम नाम लिहिले आहे. एकूण 13 भाषांमध्ये त्यांनी 32,200 वेळा ‘जय श्रीराम’ लिहिले आहे.

या विणकराचे नाव आहे जुजारू नागराजू. त्यांनी या साडीला ‘राम कोटी वस्त्रम’ असे नाव दिले आहे. या साडीवर रामायणातील सुंदरकांडाशी संबंधित भगवान रामाच्या 168 वेगवेगळ्या प्रतिमाही साडीवर बनवण्यात आल्या आहेत. ही साडी बनविण्यासाठी नागराजू यांना चार महिने लागले असून त्यामध्ये त्यांनी 16 किलो सिल्कचा वापर केला आहे. दररोज तिघांनी ही साडी बनवण्यासाठी त्यांना मदत केली.

या साडीसाठी 40 वर्षीय नागराजू यांनी आपल्या वैयक्‍तिक बचतीमधून दीड लाख रुपये खर्च केले आहेत. ही साडी ते अयोध्येतील राम मंदिराला भेट देणार आहेत. अयोध्येतील नियोजित भव्य राममंदिरासाठी देशभरातील अनेक कारागिर, कलाकार आपल्या असामान्य वस्तू अर्पण करीत आहेत. सर्वात मोठे कुलूप, सर्वात मोठी घंटा अशा अनेक वस्तू राममंदिरासाठी अर्पण करण्यात आलेल्या आहेत. आता आंध्र प्रदेशातील हा कलाकार श्रीरामनामांकित साडी मंदिराला अर्पण करणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button