सांगली : संस्था विकून थकबाकी वसूल करणार; आ. नाईक | पुढारी

सांगली : संस्था विकून थकबाकी वसूल करणार; आ. नाईक

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे थकबाकी असलेल्या संस्थांच्या मालमत्तांची विक्री करून थकीत कर्जे वसूल केली जाणार आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेला यावर्षी 130 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. एनपीए 14.38 टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, थकबाकीमुळे एनपीए वाढत असल्याने बँकेने पक्षीय विचार न करता कटूता आली तरी वसुलीसाठी कडक करण्याचे धोरण राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी टॉप 30 संस्थांच्या वसुली करण्यासाठी मालमत्ता विक्री केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने माणगंगा, महांकाली, तासगाव, यशवंत, केन अ‍ॅग्रो, डिव्हाईन फूड यासह अन्य संस्थांचा समावेश आहे. तसेच ओटीएससाठी 21 संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. हे प्रस्ताव सहकार खात्याकडे पाठविले आहेत. याबाबत सोमवार, दि. 26 रोजी बैठक आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, बँकेला यंदा 130 कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. निव्वळ नफा 31 कोटी 23 लाख झाला. ग्रॉस एनपीए 14.38 टक्के आहे. नेट एनपीए 7.85 टक्के आहे. एकूण ठेवी सहा हजार 835 कोटी आहेत. यंदा यात 411 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भागभांडवल 7 कोटी 77 लाख आहे. कर्ज वाटप 5 हजार 54 कोटी आहे. शेतीसाठी 1875 कोटींची कर्ज वाटप केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा एकूण कर्जवाटप 300 कोटींनी कमी आहे. साखर कारखान्यांनी रॉ शुगरचे उत्पादन केल्याने त्यांनी उचल घेतली नाही. त्यामुळे हे कर्ज वाटप कमी झाले आहे. एनपीएसाठी 65 कोटींची तूरतूद केली आहे. थकीत कर्जे 710 कोटींची आहेत. यामध्ये 213 कोटी शेती व 500 कोटी इतर कर्जांची थकबाकी आहे.

मध्यम मुदतचा व्याज दर 11.50 टक्के करणार

मध्यम मुदत कर्जाचा व्याज दर 12.50 टक्के आहे. हा दर 11.50 टक्केपर्यंत कमी करणार आहे. कर्मचार्‍यांना दिवाळीत एक पगार बोनस दिला जाणार आहे. तसेच ग्रामीण भागात घर बांधणी कर्जासाठी 8 अ चा उतारा ग्राह्य धरला जाणार आहे. शहरी भागात मात्र एनएची अट कायम ठेवली जाणार आहे.

Back to top button