फळे टिकवून ठेवण्याची ‘ही’ अफगाणी पद्धत! | पुढारी

फळे टिकवून ठेवण्याची ‘ही’ अफगाणी पद्धत!

काबुल ः इराणमध्ये विशिष्ट पद्धतीने बांधलेल्या तळघरात फळे व काही खाद्यपदार्थ ठेवले जात असत. आधुनिक फ्रीजचा हा प्राचीन अवतार होता. अफगाणिस्तानातही फळे टिकवून ठेवण्याची एक अनोखी पद्धत आहे. फ्रीज किंवा विजेशिवाय दीर्घकाळ द्राक्षे व अन्य फळे टिकवून ठेवण्याची ही पद्धत अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. ही पद्धत इतकी परिणामकारक आहे की लोक सहा महिन्यांपर्यंतही द्राक्षे ताजी टवटवीत ठेवू शकतात!

मातीच्या साध्या वाटणार्‍या भांड्याची ही किमया आहे. यामध्ये मातीचे दोन वाडगे किंवा कटोरे घेतले जातात. एका वाडग्यात द्राक्षे ठेवून त्यावर दुसरे वाडगे झाकणासारखे ठेवले जाते. त्यानंतर दोन्ही वाडगे एकमेकांना मातीनेच सील केले जातात. मातीला मजबूत ठेवण्यासाठी तिच्यामध्ये भुसा मिसळलेला असतो. या कंटेनरमध्ये हवा जात नाही व आतील द्राक्षे ताजी राहतात.

अनेक शतकांपासून अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील ग्रामीण क्षेत्रात या तंत्राचा वापर केला जातो. या वाडग्यांना ‘कंगिना’ असे म्हटले जाते. जुन्या पिढीतील लोक नव्या पिढीला हे तंत्र शिकवतात आणि ही परंपरा पुढे चालू राहते. असे छोटे छोटे कंगिना बनवून ते ठेवले जातात आणि हातगाडीवर ते लादून विक्रीसाठी नेले जातात. ग्राहकासमोरच हे कंगिना दगडाने फोडून आतील फळे काढून विकली जातात.

हेही वाचलंत का? 

Back to top button