उन्हापासून बचावासाठी रिक्षावरच उगविले हिरवेगार गवत | पुढारी

उन्हापासून बचावासाठी रिक्षावरच उगविले हिरवेगार गवत

नवी दिल्ली : सध्या उन्हाळा असून दिवसागणीक तापमानात वाढ होत आहे. भारतातील अनेक शहरांतील पारा 40 पेक्षाही जास्त अंशांवर पोहोचला आहे. होरपळणार्‍या उन्हापासून बचाव करून घेण्यासाठी लोक अनेक पर्यायांचा अवलंब करत आहेत. असाच प्रयत्न एका रिक्षाचालकाने केला आहे. त्याने आपल्या ई-रिक्षावर चक्‍क गवतच उगविले आहे.

ग्रीन बेल्ट आणि रोड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष एरिक सॉल्हीम यांनी नुकतेच ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका चालकाने वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी आपल्या रिक्षावर गवत, वेल आणि झाडे लावली आहेत. एरिक यांनी हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, एका भारतीय व्यक्‍तीने उन्हापासून बचाव करण्यासाठी रिक्षावरच गवत उगविले आहे. ही एक चांगली कल्पना आहे.

चालकाने आपल्या रिक्षाच्या टॉपवर हिरवेगार गवत लावले आहे. तर बाजूला वेल आणि लहान झाडेही दिसतात. यामुळे तो कडाक्याच्या उन्हात रिक्षासह स्वत:ला आणि प्रवाशांनाही गारवा देऊ शकतो. एकीकडे या रिक्षाचालकाचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे ही व्यक्‍ती भारतीय की बांगला देशी? असा वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button