लंडन ः वनस्पतींनाही संवेदना असतात, हे आपल्याच जगदीशचंद्र बसू यांनी सिद्धकरून दाखविले होते. आता तर मशरूम म्हणजेच आळंबीसारख्या बुरशी (फंगस) एकमेकांशी चक्क 'बोलतात' असा दावा एका ब्रिटिश संशोधकाने केला आहे. या मशरूमकडे 50 शब्दांचा स्वतःचा शब्दकोषही आहे व त्याच्या आधारे ते एकमेकांशी संवाद साधतात, असे या संशोधकाने म्हटले आहे.
इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंडच्या प्रा. अँड्र्यू अॅडमॅटज्की यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्याची माहिती 'रॉयल सोसायटी ओपन सायन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रा. अँड्र्यू यांनी सांगितले की, बुरशीचे 'स्पायकिंग पॅटर्न' आणि मानवी भाषा यांच्यामध्ये काही नाते आहे की नाही, हे कळण्यास मार्ग नाही; पण बुरशी आपापसात संवाद मात्र साधू शकतात.
फंगी म्हणजेच बुरशीत त्यासाठीचा मेंदू आणि चेतना दोन्ही असते, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार फंगल शब्दकोशात 50 शब्द असू शकतात. मात्र, ते यापैकी पंधरा ते वीस शब्दांचा अधिक वापर करतात. त्यांनी हे संशोधन एनोकी, स्प्लिट गिल, घोस्ट आणि कॅटरपिलर फंगी या प्रजातींवर केले आहे. प्रत्येक फंगल वर्डची (शब्द) सरासरी लांबी 5.97 अक्षरांची असते, म्हणजेच मानवी शब्दांपेक्षा थोडी मोठी.
हे मशरूम एकमेकांना हवामान आणि येणार्या धोक्यांची माहिती देतात. इलेक्ट्रिक अॅक्टिव्हिटी पॅटर्नचे विश्लेषण करून याबाबतचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. अर्थात, सर्वच संशोधक या संशोधनाशी सहमत नाहीत. एक्सेटर युनिव्हर्सिटीचे डॅन बेबर यांनी सांगितले की, यावर अधिक संशोधनाची गरज आहे. 'इलेक्ट्रिक अॅक्टिव्हिटी'ला भाषा ठरविणे घाईचे ठरेल!
हेही वाचलंत का?