लंडन ः आपल्याकडे मार्चमध्येच उन्हाने चुणूक दाखवून देण्यास सुरुवात केली होती आणि एप्रिलमध्ये तर सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. अशावेळी आपल्यासोबत सतत 'एसी' असावा असे कुणालाही वाटू शकते. 'द मेटौरा प्रो' या कंपनीने आता जगातील पहिला असा एसी तयार केला आहे की, जो चक्क गळ्यात अडकवून फिरता येऊ शकते. या पोर्टेबल व वेअरेबल एसीमुळे कुठेही आपण 'थंड' राहू शकतो!
हा एसी गळ्यात अडकविणार्या व्यक्तीच्या आसपास थंड हवा राहते व त्याला गारेगार वाटते! या एसीला फॅन मोड किंवा कूलर मोडवरही वापरता येऊ शकते. फॅन मोडवर सामान्य तापमान ते 7 फॅरेनहाईट थंड हवा मिळेल, तर कुलिंग मोडवर 18 अंश फॅरेनहाईटपर्यंत थंड हवा मिळेल. हे नवे डिव्हाईस वापरण्यासाठी एक अॅप असेल. ज्यामुळे उपकरणातून येणार्या गारव्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकेल.
हा गळ्यात अडकवता येणारा एसी ट्विट टर्बो 'पीडब्ल्यूएम' मोटारीच्या सहाय्याने चालविला जाईल. यामध्ये 26 छोटे- छोटे पंखे असतील. जी व्यक्ती हा एसी गळ्यात अडकवेल तिच्या आसपासची उष्णता नष्ट होऊन सुखद गारवा निर्माण होईल. एसीमध्ये एक व्हीसी प्लेट, लिक्विड कुल्ड, हिट इक्वलायझिंग मेकॅनिझमही आहे. त्यामध्ये 121 जोड्या सेमी कंडक्टर्स बसविलेले आहेत. उष्ण तापमान थंड करण्यासाठी ते पूर्णपणे सक्षम आहेत. या वेअरेबल कूलर कॉलरची बॅटरी झटपट चार्ज होते आणि एकदा चार्ज झाल्यावर आठ तास चालते. कॉलरचे वजन साधारणपणे 435 ग्रॅम आहे.
हेही वाचलंत का?