नाशिक : मनपाच्या मालमत्ताकराचा कर्मचार्‍यांकडूनच अपहार | पुढारी

नाशिक : मनपाच्या मालमत्ताकराचा कर्मचार्‍यांकडूनच अपहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या मालमत्ता (घरपट्टी) आणि पाणीपट्टी कराचा महापालिकेच्या नाशिकरोड विभागातील दोन कर्मचार्‍यांनी अपहार केल्याची बाब समोर आली असून, अपहाराच्या रकमेचा आकडा सुमारे 40 ते 45 लाख इतका आहे. अपहाराचा प्रकार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखा असून, अपहार होऊनही मनपा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही अद्याप संबंधितांवर झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

घरपट्टी आणि पाणीपट्टी हा महसूल मिळवून देणारा महापालिकेचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे या स्वरूपातील कर अधिकाधिक वसुलीसाठी मनपाच्या विविध कर आकारणी विभागाकडून प्रयत्न केले जातात. मनपाच्या संकेतस्थळाबरोबरच एनएमसी ई-कनेक्ट या अ‍ॅपद्वारे कर भरण्यासाठी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय मनपाने युनियन बँकेच्या सहकार्याने मनपाच्या सहाही विभागीय कार्यालयांसह विविध ठिकाणी नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातूनही विविध स्वरूपाच्या परवानग्यांसह कराचा भरणा करण्यात येत असतो. त्यासाठी प्रत्येक केंद्रांमध्ये बँकेने आणि मनपाने संयुक्तरीत्या सॉफ्टवेअर यंत्रणा निर्माण केलेली आहे.

याच सॉफ्टवेअरशी छेडछाड करून नाशिकरोड विभागातील नाशिकरोड कार्यालय आणि गांधीनगर येथील भरणा केंद्रांमधील काही कर्मचार्‍यांनी कर भरणा रकमेचा अपहार केल्याची माहिती उघड झाली आहे. अपहार करताना संबंधितांनी चेहडी येथील भरणा केंद्राचा पासवर्ड वापरून गांधीनगर येथील सुविधा केंद्रातून अपहार केला आहे. परंतु, याबाबत अद्याप मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई संबंधितांवर केली नाही. यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी नाशिकरोड विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

अपहार झालेल्या रकमेसंदर्भातील रेकॉर्ड ऑडिटसाठी मनपा मुख्यालयाकडे सादर करण्यात आले आहे. त्यानुसार तपासणी होऊन संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल.
– दिलीप मेनकर,
विभागीय अधिकारी, ना.रोड

रेकॉर्ड प्राप्त झाले आहे. काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले असून, तसे पत्र नाशिकरोड कार्यालयाला दिले आहे.
– बी. जी. सोनकांबळे,
मुख्य लेखापरीक्षक

हेही वाचा :

Back to top button