तब्बल 2 कोटी 70 लाख लोकांचे विशाल ‘कुटुंब’! | पुढारी

तब्बल 2 कोटी 70 लाख लोकांचे विशाल ‘कुटुंब’!

लंडन : जगभरात अनेक मोठी तसेच एकत्र कुटुंबं आहेत ज्यामध्ये 50, 100 किंवा दीडशे सदस्यही असतात. मात्र, वैज्ञानिकांनी एक असे ‘कुटुंब’ बनवले आहे ज्यामध्ये तब्बल 2 कोटी 70 लाख लोक आहेत. ही जगातील सर्वात मोठी ‘फॅमिली ट्री’ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामधील लोक अनुवंशिकद‍ृष्ट्या एकमेकांचे दूरचे नातलग असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

या वंशवृक्षाचे मूळ दहा हजार वर्षे जुने आहे. त्याच्या अभ्यासातून माणसाच्या उत्पत्तीविषयी अधिक माहिती समजून घेण्यास मदत मिळेल. तसेच या मोठ्या कुटुंबवृक्षामुळे वैद्यकीय रहस्येही उलगडता येऊ शकतील. डॉ. यान वोंग यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन करण्यात आले. त्यांनी सांगितले की हा विशाल कुटुंब वृक्ष जनुकीय वैविध्य समजून घेण्यासाठी मदत करील. ‘सायन्स’ या  नियतकालिकामध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. टीमने आठ डेटाबेसमध्ये असलेल्या 3,609 लोकांच्या जनुकांचा अभ्यास केला. त्यानंतर कॉम्प्युटर अ‍ॅल्गोरिदमच्या माध्यमातून या लोकांचे पूर्वज जगभरात कुठे कुठे राहत होते हे सांगितले. त्यानंतर वैज्ञानिकांच्या टीमने 27 दशलक्ष लोकांचे एक कुटुंबच तयार केले. डॉ. यान यांच्या टीमने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या साथीने हे संशोधन केले आहे. हे लोक कुठे ना कुठे एकमेकांशी रक्‍ताच्या नात्याने जोडलेले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Back to top button