डेथ क्लेम सेटलमेंट करताना काय काळजी घ्यावी ? | पुढारी

डेथ क्लेम सेटलमेंट करताना काय काळजी घ्यावी ?

लहान बचत योजनांत पैसे जमा करणार्‍या एखाद्या व्यक्‍तीचा अकाली मृत्यू झाल्यास नॉमिनी हा खात्यातून पैसे काढू शकतो. अलीकडेच टपाल खात्याने लहानसहान योजनांच्या दावा करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. यात अनेक प्रकारचे बदल केले आहेत.

लहान बचत योजनांत मंथली इन्कम स्कीम, पब्लिक प्रॉव्हिडंड फंड (पीपीएफ), नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी) आदींचा समावेश आहे.

* कोणता पुरावा ग्राह्य धरतात?
अधिसूचनेनुसार डेथ क्लेम प्रकरणातील सेटलमेंट करण्यासाठी अनेक पुरावे सादर करणे गरजेचे असते. दाव्याची रक्‍कम ही पाच लाख रुपये असेल तर सेटलमेंट हे नॉमिनेशन, कायदेशीर पुरावा किंवा पुरावा नसेल तर प्राधिकारणाने काढलेला तोडगा या आधारावर होते. त्याचवेळी दाव्याची रक्‍कम ही पाच लाखांपेक्षा अधिक असेल आणि कायदेशीर पुरावा नसेल तर दावा करणार्‍या व्यक्‍तीला कोर्टातून वारसा प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

* डेथ क्लेम सेटलमेंट कसे असेल?
नॉमिनीची नोंद आहे की नाही, या आधारावर सेटलमेंट केले जाते. किंवा दावा करणारा व्यक्‍ती कायदेशीर पुरावा सादर करत आहे किंवा नाही, हे देखील पाहिले जाते.

* नॉमिनीची नोंद असेल तर…
पोस्ट ऑफिसमध्ये लहान बचत योजनांच्या बाबतीत नॉमिनीची नोंद असेल तर पोस्ट ऑफिस संबंधित नॉमिनीला पैसे देईल. नॉमिनीचा उल्लेख असेल आणि त्याच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा असो किंवा नसो, पोस्ट ऑफिसकडून ती रक्‍कम अदा केली जाते.

नॉमिनीला गुंतवणूकदाराचे मृत्यू प्रमाणपत्रासह पोस्ट ऑफिसकडे अर्ज करावा लागेल. त्याचबरोबर पासबुक आणि प्रमाणपत्रदेखील जोडावे लागेल. जर दावा करणारा व्यक्‍ती मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत देण्यास असमर्थ असेल, तर संबंधित पोस्ट ऑफिस त्याची फोटोकॉपीदेखील मान्य करू शकते. कॉपी मान्य करण्यापूर्वी अ‍ॅथोरिटीला फोटोकॉपी किंवा मूळ कागदपत्राची तुलना करावी लागेल.

सरकारने 16 सप्टेंबर 2020 रोजी एक अधिसूचना काढली. त्यानुसार जर अन्य कागदपत्रांबरोबर साक्षीदाराचे ओळखपत्र आणि सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी असेल, तर लाभार्थ्याने दावा करताना प्रत्यक्ष हजर असणे गरजेचे नाही. ओळखपत्राच्या पुराव्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आदींचा समावेश आहे. रहिवाशाच्या पुराव्यात आधार कार्ड, पासपोर्ट, वीज बिल, बँक पासबुक आदींचा समावेश होतो. जर एकापेक्षा अधिक नॉमिनी असतील आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला असेल तर दावा करणार्‍या व्यक्‍तीने दुसर्‍या नॉमिनीचे मृत्यू प्रमाणपत्रदेखील सादर करावे लागेल.

* सर्व वारसदारांचा मृत्यू झाल्यास
प्रमाणपत्रात उल्लेख असलेल्या शेवटच्या वारसदाराचा मृत्यू झाल्यास खात्याशी निगडित दाव्याला शेवटच्या वारसदाराच्या कायदेशीर वारसाला लाभार्थी म्हणून निश्‍चित केले जाईल. अशा प्रकरणात मृत डिपॉझिटरच्या कायदेशीर वारसाच्या बाजूने निकाल दिला जात नाही.

* मूळ पासबुक/प्रमाणपत्र हरवल्यास
नॉमिनीकडून मूळ पासबुक आणि प्रमाणपत्र हरवले गेले असल्यास संबंधित अ‍ॅथोरिटीकडून दावा मान्य केल्यानंतर आपल्या नावावर पासबुक/सर्टिफिकेट जारी करण्यासाठी अर्ज करावा लागेल.

* कायदेशीर पुरावे सादर केलेले असल्यास
नॉमिनेशनचा उल्लेख नसलेल्या प्रकरणाचा विचार केल्यास त्यात दावा करण्यासाठी कायदेशीर पुरावे द्यावे लागतील. त्यात सक्शेनशन सर्टिफिकेट, वारसापत्र, प्रशासकीय पत्र आदींचा समावेश आहे. अर्जासोबत अन्य कागदपत्रासमवेत दावा करणार्‍या व्यक्‍तीला डिपॉझिटरचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.

* नॉमिनेशन/कायदेशीर पुरावे नसल्यास
काही प्रकरणात नॉमिनेशनही नसते आणि कोणी कायदेशीर पुरावा आणून देण्यातही समर्थ नसतो. अशा स्थितीत या दाव्याची रक्‍कम पाच लाखांपर्यंत असेल तर कायदेशीर वारस हा डिपॉझिटरच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी दावा करू शकतो.

* कोणती कागदपत्रे हवीत?
मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत, पासबुक, प्रमाणपत्र, अकाऊंट सर्टिफिकेट, फॉर्म 13 मध्ये शपथपत्र, फॉर्म-14 मध्ये लेटर ऑफ डिस्क्लेमर, फॉर्म 15 मध्ये बाँड ऑफ इनडेमनिटी.

* सात वर्षांपासून बेपत्ता असलेल्या गुंतवणूकदाराचा दावा
सात वर्षांपेक्षा अधिक काळ बेपत्ता असलेल्या गुंतवणूकदाराला मृत म्हणून गृहीत धरले जाईल आणि नियमानुसार दाव्याचा निपटारा केला जाईल.

जगदीश काळे

Back to top button