

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Break : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. आयसीसीच्या मेगा इव्हेंटनंतर लगेचच खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मासह सर्व अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे संघाला तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यामुळे सर्व वरिष्ठ खेळाडू पुन्हा संघाचा भाग बनतील. मात्र विराट कोहलीच्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
वास्तविक, कोहलीने द. आफ्रिका दौऱ्यावर वनडे, टी-20 मालिका खेळण्यास नकार दिला आहे. वृत्तानुसार, विराट कोहलीने व्हाईट-बॉल फॉरमॅटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याची माहिती त्याने बीसीसीआयला दिली आहे. पण यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो व्हाईट-बॉल फॉरमॅटसाठी कधी उपलब्ध होणार याची माहिती तो स्वतः बोर्डाला देणार असल्याचे त्याने बीसीसीआयला सांगितले आहे. याचाच अर्थ विराट केवळ द. आफ्रिकेविरुद्धच नाही तर पुढील काही महिन्यांत होणाऱ्या सर्व व्हाईट-बॉल मालिकेतही खेळताना दिसणार नसल्याचे समजते आहे.
केवळ विराट कोहलीच नाही तर कर्णधार रोहित शर्माही द. आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या व्हाईट-बॉल मालिकेतून माघार घेणार असल्याचे समजते आहे. मात्र, अद्याप त्याने याबाबत काही स्पष्ट केलेले नाही. मात्र विराट कोहलीप्रमाणे रोहितही या मालिकेतून ब्रेक घेऊ शकतो, असे मानले जात आहे. मात्र, दौऱ्याच्या शेवटी होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत हे दोन्ही अनुभवी खेळाडू उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, निवड समिती व्हाईट-बॉल टीमचे कर्णधारपद केएल राहुल किंवा जसप्रीत बुमराह यांच्याकडे सोपवू शकते. (Virat Kohli Break)