

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत अंतिम संघ शुक्रवारी निश्चित झाले. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करत गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) संघाने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात गुजरातच्या सलामीवीर शुभमन गिल याने शतकी खेळी केली. आयपीएल कारकिर्दीतील त्याचे हे तिसरे शतक ठरले. विशेष म्हणजे, ही तिन्ही शतके त्याने सलग चार सामन्यांमध्ये झळकावली आहेत. मुंबई विरुद्धच्या क्वालिफायर-2 सामन्यात शुभमनने ६० चेंडूत ७ चौकार आणि तब्बल १० षटकार फटकावत १२९ धावा केल्या. त्याच्या अविस्मरणीय खेळीनंतर सोशल मीडियावर विराट कोहलीपासून ते एबी डिव्हिलियर्स आणि युवराज सिंगपर्यंत अनेक दिग्गजांनी शुभमनवर कौतुकावा वर्षाव केला आहे. ( Shubman Gill IPL 2023 )
सोशल मीडियावरील काही चाहत्यांनी शुभमनची तुलना भारतीय क्रिकेटच्या 'किंग' कोहलीशी करण्यास सुरुवात केली आहे, कारण दोघेही लहान वयापासून आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले आहे. कोहलीनेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शुभमनचा फोटो शेअर त्याचे अभिनंदन केले आहे. . भारताचा २०११ विश्वचषक विजेता संघातील अष्टपैलू युवराज सिंगनेही गिलचे कौतुक केले. युवराजने ट्विट केले, "भारतीय क्रिकेटच्या नव्या राजकुमाराची आणखी एक शानदार खेळी!!
गेल्या वर्षी कार अपघातात जखमी झाल्याने आयपीएल 2023 ला मुकलेल्या ऋषभ पंतनेही गिलच्या खेळीचा आनंद लुटला. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पंतने कॅप्शनमध्ये लिहिले – क्लास बाबा. भारताचा माजी मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनानेही ट्विट केले आहे. त्याने लिहिले – युवा उस्ताद शुभमन गिलचे आणखी एक शानदार शतक! भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे. रॉकिंग, चॅम्प!
दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सनेही गिलच्या खेळीचे कौतुक केले आहे. ही खेळी पाहिल्यानंतर तो अवाक झाल्याचे सांगितले. डिव्हिलियर्सने ट्विट केले- शुभमन गिल! व्वा. माझ्याकडे शब्द नाहीत. सामन्यातील निर्णायक क्षण शोधण्याची आणि धावा काढण्यासाठी अचानक वेग वाढवण्याची त्याची क्षमता त्याला खूप उच्च श्रेणीत आणते. हे देखील लक्षात घ्या की ते बहुतेक सामने अहमदाबादमध्ये खेळले आहेत, जे सर्वात मोठ्या मैदानांपैकी एक आहे. शुभमन छान खेळला.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही गिलच्या शतकाचे कौतुक करताना म्हटले आहे की, "शुभमन गिलची फलंदाजी पाहण्यासाठी छान आहे." भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "काय खेळाडू आहे. चार सामन्यांमध्ये तिसरे शतक आणि काही शानदार शॉट्स. अप्रतिम सातत्य आणि भूक, जी मोठ्या खेळाडूंमध्ये दिसते. असाच फॉर्म कायम ठेवा."
शुभमन गिलकडे यंदाच्या आयपीएल मध्ये ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणार खेळाडू) आहे. त्याने १६ सामन्यात ६०.७८ च्या सरासरीने ८५१ धावा केल्या आहेत ज्यात तीन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १२९ आहे. त्याच्या धावा १५६.४३ च्या स्ट्राइक रेटने झाल्या आहेत.
हेही वाचा :