

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Record : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली. दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कोहलीने दुसऱ्या डावात 8 धावा करताच त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील 25 हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय तर जागतिक क्रिकेटमधील सहावा फलंदाज ठरला आहे.
कोहलीचा कसोटी कारकिर्दीतील हा 106 वा सामना आहे. त्याने आतापर्यंत 48.00 पेक्षा जास्त सरासरीने 8,195 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर सात द्विशतके, 27 शतके आणि 28 अर्धशतके आहेत. तर त्याने 271 एकदिवसीय सामन्यांमध्ये 57.70 च्या सरासरीने आणि 93.77 च्या स्ट्राइक रेटने 12,809 धावा फटकावल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 46 शतके आणि 64 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4,008 धावा केल्या आहेत. (Virat Kohli Record)
1. सचिन तेंडुलकर (भारत) : 34357 धावा
2. कुमार संगकारा (श्रीलंका) : 28016 धावा
3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) : 27483 धावा
4. महेला जयवर्धने (श्रीलंका) : 25957 धावा
5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) : 25534 धावा
6. विराट कोहली (भारत) : 25012 धावा
विराट कोहली हा सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम सातत्याने मोडत आहे. 25 हजार धावा पूर्ण करताच त्याने सचिनचा आणखी एक विक्रम मोडला. खरे तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 576 डावांमध्ये सर्वात जलद 25,000 धावा करण्याचा विक्रम यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. परंतु कोहलीने केवळ 549 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात वेगवान खेळाडू बनला आहे. यापूर्वी, रिकी पाँटिंगने 588 डावात, जॅक कॅलिसने 594 डावात, कुमार संगकारा 608 आणि महेला जयवर्धने 701 डावात हा आकडा पार केला आहे.
सक्रिय खेळाडूंमध्ये विराट कोहलीशिवाय जो रूट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. जो रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 17729 धावा केल्या आहेत. तो विराटपेक्षा 7000 धावांच्या मागे आहे. एवढ्या धावा करण्यासाठी जो रूटला पुढची अनेक वर्षे लागतील. त्यामुळे कोहलीचा हा विक्रम मोडणे सध्याच्या काळातील खेळाडूंसाठी खूपच अवघड असे काम आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. (Virat Kohli Record)