

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja Record : अष्टपैलू रवींद्र जडेजाने दिल्ली कसोटीत दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात त्याने सात विकेट्स घेतल्या. कमीत कमी षटकात इतके बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. या 7 पैकी 5 फलंदाजांना जडेजाने क्लिन बोल्ड करून ऐतिहासिक गोलंदाजीचीही नोंद केली.
जडेजाने कसोटीत सात विकेट घेण्याची दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा त्याने 2016 मध्ये चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 48 धावांत 7 बळी घेतले होते. आता दिल्ली कसोटीत जडेजाने फक्त 12.1 षटकात 42 धावा देऊन सात कांगारूंना माघारी धाडले. यापूर्वी हा विक्रम आर. अश्विनच्या नावावर होता, ज्याने 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 13.5 षटकात 7 किंवा त्याहून अधिक बळी घेतले होते. तर नरेंद्र हिरवाणी (विरुद्ध वेस्ट इंडिज, 1988) आणि इरफान पठाणने (विरुद्ध झिम्बाब्वे, 2005) 15.2 षटकांत अशी कामगिरी केली होती. अनिल कुंबले चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2004 मध्ये 17.3 षटकांत 7 विकेट घेतल्या होत्या. (Ravindra Jadeja Record)
जडेजा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणारा आशियातील डावखुरा फिरकीपटू ठरला आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज इम्रान कासिमचा क्रमांक लागतो, ज्याने 1980 च्या कराची कसोटीत 49 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. तिसरी सर्वोत्तम कामगिरी श्रीलंकेचा माजी फिरकीपटू रंगना हेराथ (7/64, कोलंबो कसोटी, 2016) याच्या नावावर आहे.