Pudhari ZMQ Development NGO: बालकांचं आरोग्य सुरक्षित राहावं आणि कुठलाही मुलगा-मुलगी लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी ZMQ Foundation तर्फे कल्याणमध्ये ‘घरघर टीका – लस कल्याण’ हा विशेष उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात आता अनेक नागरिक मनापासून सहभागी होत असून, समाजसेवकांच्या पुढाकारामुळे मोहिमेला गती मिळाली आहे.
या मोहिमेतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे सद्दाम मन्सुरी. कल्याण पश्चिमेतील सांगळेवाडी परिसरात ते घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करत आहेत. एका कंपनीत कामगार असलेले सद्दाम मन्सुरी गेली दहा वर्षे समाजिक कार्य करत आहेत. परिसरातील लोकांशी असलेला त्यांचा संपर्क आणि विश्वास याचा मोठा फायदा या लसीकरण मोहिमेला होत आहे.
ZMQ डेव्हलपमेंट टीमकडून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर सद्दाम मन्सुरी यांनी लसीकरणाचं महत्त्व लोकांना समजावून सांगण्याचं काम हाती घेतलं. कोणत्या वयात कोणती लस घ्यावी, लसीकरणामुळे कोणत्या आजारांपासून संरक्षण मिळतं, लस सुरक्षित आहे का? अशा अनेक प्रश्नांची ते सोप्या भाषेत उत्तरे देतात. विशेषतः गरीब आणि कामगार वर्गातील कुटुंबांना लसीकरणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं योगदान मोलाचं ठरत आहे.
“लसीकरणामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, आजारांशी लढण्याची ताकद मिळते. लस पूर्णपणे सुरक्षित असून ती सरकारतर्फे दिली जाते. लसीकरणामुळे आजार होतात, हा गैरसमज आहे,” अशी माहिती ते नागरिकांना देतात. कोणतंही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सद्दाम मन्सुरी यांच्यासारख्या लसीकरण चॅम्पियन्समुळेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पुढारी मीडियाच्या सहकार्याने राबवली जाणारी ‘लस कल्याण’ मोहीम कल्याणमध्ये यशस्वी ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून आरोग्य चळवळ उभी राहू शकते, हेच या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून येत आहे.