Pudhari Zmq development NGO: बालकांचं आयुष्य सुदृढ राहावं, कुठलाही आजार लसीकरणाअभावी होऊ नये, यासाठी ZMQ Foundation तर्फे ‘लस कल्याणाची’ ही विशेष लसीकरण जनजागृती मोहीम राबवली जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पुढारी मीडियाच्या सहकार्याने ही मोहीम कल्याण परिसरात प्रभावीपणे राबवली जात आहे.
या मोहिमेची खास बाब म्हणजे, इथे फक्त आरोग्य कर्मचारीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकही ‘लसीकरण चॅम्पियन’ म्हणून पुढे आले आहेत. कोणी रिक्षाचालक आहे, कोणी मेडिकल स्टोअरचा मालक, तर कोणी गृहिणी, या सगळ्यांचा एकच उद्देश आहे, आपल्या परिसरातील प्रत्येक बाळाचं लसीकरण वेळेत व्हावं.
याच मोहिमेतील एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे विशाल मस्के. व्यवसायाने रिक्षाचालक असलेले विशाल मस्के हे कल्याणमधील रिक्षाचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते आरोग्य क्षेत्रातही सक्रियपणे काम करत आहेत.
ZMQ संस्थेच्या डेव्हलपमेंट टीमकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर विशाल मस्के लसीकरण मोहिमेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून आपल्या विभागात जनजागृती सुरू केली. घरोघरी भेटी देणे, समाजमंदिरांमध्ये लोकांशी संवाद साधणे, गरोदर महिला आणि नवजात बालकांच्या मातांना लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगणे, हे सगळं काम ते सातत्याने करत आहेत.