

पुढारी ऑनलाईन: पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ढग जमा झाले आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ तासात पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील घाट क्षेत्राचा देखील समावेश होत असल्याचे सॅटेलाईटच्या माध्यमातून टिपलेल्या छायाचित्रावरून दर्शवत आल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. यासंदर्भातील माहिती आयएमडी पुणेचे विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या सहा ते सात दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मात्र अनेक जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. परंतु राज्यात येत्या काही दिवसात पाऊस सक्रिय राहील, असा अंदाज देखील यापूर्वी डॉ. के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटवरून वर्तवला होता.
महाराष्ट्र-केरळ किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढगांचे डोंगर (ऑफ शोअर ट्रफ) तयार झाल्याने आगामी पाच दिवस कोकण व गोवा भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाटाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात आगामी ४८ तास संततधार राहील. दरम्यान, मान्सून वेगाने वाटचाल करत असून, तो काही तासात संपूर्ण भारत व्यापणार असल्याची स्थिती आहे. दरम्यान बुधवारी (दि.२९ जून) मान्सूनने जवळपास ९९ टक्के देश व्यापला असून, तो लवकरच संपूर्ण देश व्यापणार असल्याचे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.