

पिरंगुट : मुळशी तालुक्यामध्ये जमिनीचा ताबा मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा वापर केला जात आहे. नामांकित गुन्हेगार आपल्या आलिशान कार्यालयामध्ये बसून स्वतःच्या पाळलेल्या चिल्लर गुंडांना पाठवून ही कामे करून घेतानाचे चित्र सध्या तालुक्यामध्ये दिसत आहे.मुळशी तालुक्यातून 'रिंग रोड' गेला असल्याने रिहे खोरे, कासार-आंबोली, आंबेगाव, उरावडे या परिसरातील शेतकर्यांना जमिनीपोटी कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. या परिसरातील जमिनींच्या व्यवहाराला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. अनेक गुन्हेगारांनी या परिसरातील ज्या शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळणार आहे त्या शेतकर्यांची यादीच तयार करून ठेवलेली आहे. यामधे अनेक वेळा शेतकरी तक्रार करण्याची हिंमत दाखवत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होतो आहे.
संबंधित बातम्या :
अनेक शेतकर्यांच्या जमिनींवर चुकीची कागदपत्रे तयार करून खरेदीखते तयार करून ताबा मारलेला आहे. याबाबत अनेक तक्रारी महसूल विभागाकडे तसेच पोलिस ठाण्यामध्ये आलेल्या आहेत. हा 'भाई'माझ्या ओळखीचा, तो 'दादा' माझा नातेवाईक आहे अशा प्रकारची वाक्ये वापरून दमदाटी, दादागिरी करण्याचे वरील प्रकार सध्या तालुक्यामध्ये सर्रास घडत आहेत. या सर्व प्रकाराला कंटाळून अनेक शेतकर्यांनी आपल्या जमिनीची विक्री करून थेट पुणे आणि मुंबई गाठली आहे. गावाकडे गावातील फक्त राहते घर ठेवायचे, बाकी सर्व जमीनजुमला विकायचा आणि मुंबई आणि पुण्यामध्ये जाऊन फ्लॅट खरेदी करून तिथेच राहायचे आणि 'सेटल' व्हायचे असे केले आहे.
या सर्व प्रकारामध्ये गावातील जमिनीची विक्री करणा-या दलालांचा मोठा वाटा आहे. गावातील गावगुंडाला पकडायचे शेतकर्याला दमदाटी करायची, त्याच्या जमिनीत वाद (लेटीकेशन) तयार करायचे आणि सोन्याचा भाव असलेली ती जमीन कवडीमोल भावाने एखाद्या मोठ्या अधिकार्याला किंवा बांधकाम व्यावसायिकाला विकायची, असा सध्या सपाटाच मुळशी तालुक्यामध्ये सुरू आहे.
गुंडांना राजकीय वरदहस्त
तालुक्यातील काही गुंड आता विविध राजकीय पक्षांची पदे घेऊन 'व्हाईट कॉलर' गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांच्यावर पूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत असे गुंड आता तालुक्यामध्ये काळ्या काचा असलेल्या आलिशान गाड्यांमध्ये अतिशय बिनधास्तपणे फिरत आहेत. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच हा सर्व प्रकार उघड्या डोळ्याने सर्वसामान्य नागरिकांना पाहावा लागत आहे.