नागपूर : काँग्रेसच्या आढावा बैठकीत गदारोळ; समर्थकांसह नेते आमने-सामने | पुढारी

नागपूर : काँग्रेसच्या आढावा बैठकीत गदारोळ; समर्थकांसह नेते आमने-सामने

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात आज (दि.१२) महाकाळकर सभागृहात झालेली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आढावा बैठक वादळी ठरली. मर्यादित प्रवेश असताना या सभागृहात मोठी गर्दी झाली. माध्यम प्रतिनिधींशी देखील कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याने वातावरण अधिकच तापले.

संबंधित बातम्या : 

आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी अमरावतीला बैठक झाली. आज पूर्व विदर्भ विभाग बैठक सुरू असताना गोंधळ पाहायला मिळाला. यानिमित्ताने नागपुरातील काँग्रेसची गटबाजी उघड झाली आहे. शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्यात वाद झाल्याने वातावरण तापले. जिचकार यांनी आमदार ठाकरे बोलत असताना माईक हिसकावल्याचा आरोप समर्थकांनी केला. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने यात अधिक भर पडल्याचीही चर्चा रंगली. विशेष म्हणजे यावेळी समर्थकांसोबतच दोन्ही नेत्यांचे नेते आमने-सामने आले. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा राडा झाल्याने या दोन गटातील वर्चस्वाची लढाई देखील पुढे आली. पदाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलू दिले जात नसल्याचा संताप व्यक्त केला.

राज्य काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस कार्यकर्ते भाऊराव कोकणे, वसीम शेख यांनी यासंदर्भात आपल्या भावना बोलून दाखविल्या. खूप गर्दी झाल्याने थेट व्यासपीठावर पदाधिकारी, कार्यकर्ते आले. पोडियमला धक्का लागला माईक कुणीही हिसकवला नसल्याचे सांगत माध्यमांशी गैरवर्तन झाल्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. यावेळी माजी मंत्री विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक आदी अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर स्मारकावरून सुरू झालेल्या वादाची देखील किनार या ठाकरे-जिचकार वादात असल्याचे बोलले गेले. जिचकार यांची भाजप नेत्यांशी जवळीक असल्याने त्यांना काँग्रेसमधून दूर करा, अशी मागणी ठाकरे समर्थकांनी यावेळी केली.

हेही वाचा : 

Back to top button