

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत सरकारने दहशतवादाविरोधात प्रभावी कामगिरी केली आहे. दहशतवादी संघटनांची ओळख पटवणे, अशा संघटनांचा नायनाट करत दहशतवादाचा धोका कमी करण्याचा दृष्टीने भारताची कामगिरी उत्कष्ट आहे, असे अमेरिकेतील ब्युरो ऑफ काउंटर टेरेरिझमचच्या 'कंट्री रिपोर्ट्स ऑन टेरेरिझम २०२१' अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Counter Terrorism)
'कंट्री रिपोर्ट्स ऑन टेरेरिझम २०२१' अहवालात म्हटले आहे की, भारतातील केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर, ईशान्य भारतातील राज्ये तसेच मध्य भारतातील काही राज्यांमध्ये दहशतवादाचा प्रभाव आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, आयएसआयएस, अल कायदा, जमात -उल- मुजाहिदीन, जमात -उल -मुजाहिदीन बांगलादेश यासारख्या दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. 2021 मध्ये दहशतवादी संघटनांनी सामान्य नागरिकांना लक्ष्य करून ड्रोन आणि आयईडी स्फोट घडवत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
२०२१ या वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये १५३ दहशतवादी हल्ले झाले, ज्यामध्ये ४५ सुरक्षा दलाचे जवान, ३६ नागरिक आणि १९३ दहशतवादी अशा एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये भारतातील दहशतवाद प्रभावित क्षेत्रात फारसा बदल झालेला नाही;पण भारताने राज्य आणि केंद्र पातळीवर गुप्तचर यंत्रणा मजबूत केल्या असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताने बंदरांच्या सुरक्षेसाठी प्रवेशद्वारावर बायोग्राफिक आणि बायोमेट्रिक स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे. भारताची
राष्ट्रीय तपास संस्था ( एनआयए ) लष्कर-ए-तोयबा, हरकत उल जिहादी इस्लामी या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केली. 'एनआयए'ने सप्टेंबर 2021 मध्ये ISIS शी संबंधित ३७ प्रकरणांचा तपास करत १६८ जणांना अटक करत प्रभावी कामगिरी केल्याचे 'कंट्री रिपोर्ट्स ऑन टेरेरिझम २०२१' अहवालात म्हटले आहे.
दहशतवादग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर लोककल्याणाच्या कार्य कसे करते, याचाही या अहवालात उल्लेख आहे. यामध्ये शाळा चालवणे, वैद्यकीय शिबिरे उभारणे तसेच तरुणांना कट्टरपंथी होण्यापासून रोखण्यासाठी रोजगार प्रशिक्षण देण्यासह रोजगार उपलब्ध करून देणे असे विधायक कार्य भारतीय सैन्यदल करत असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा :