

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाषाण तलावाच्या परिसरात अविवाहित जोडप्यांना फिरण्यास आणि बसण्यास बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
पाषाण तलावाच्या परिसरात वृक्षांची संख्या मोठी आहे. या तलावाच्या परिसरातली वृक्षांवर विविध जातीच्या पक्षांचे वास्तव्य आहे. पक्षी निरीक्षणाची आणि पर्यावरणाची आवड असणारे नागरिक या तलावाला भेट देण्यासाठी येत असतात. पुणे महापालिकेकडून तसेच पक्षी व पर्यावरणप्रेमी संघटनांकडूनही पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न व उपाययोजना सुरू असतात. प्रामुख्याने या तलावात मैलापाणी येऊ नये व जलपर्णी वाढू नये आणि परिसरातील जैवविविधता कायम राहावी यासाठी कामे सुरू असतात.
मात्र गेल्या काही वर्षांत या तलावावर फिरण्यासाठी येणाऱ्या प्रेमी युगुलांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणामध्ये येणाऱ्या नागरिकांना अडथळे येत असल्याने तसेच हा तलावाचा परिसर खूप मोठा असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या तलावावर अविवाहित जोडप्यांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
''पाषाण तलावावर फिरण्यासाठी येणाऱ्या प्रेमी युगुल अथवा अविवाहित जोडप्यांमुळे वाद विवाद होऊ शकतात. याठिकाणी दोन मृतदेह आढळून येण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांनाही अडथळा होत होतो. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने पाषाण तलावाच्या परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर शहरातील इतर सर्व उद्याने मात्र सर्वांसाठी खुली आहेत.''
– अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका