

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दिल्लीतील नागरिकांनाही आता पुण्याचे आकर्षण वाटू लागले आहे. दिल्लीतील तीन शाळकरी अल्पवयीन मुलींनी घरात काही न सांगता पुणे गाठले. मात्र पुण्यात आल्यानंतर राहण्यासाठी लॉजची चौकशी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तिघींना ताब्यात घेऊन त्यांना मुंढव्यातील बाल सुधारगृहात पाठवले. त्यांच्या नातेवाईकांना दिल्ली येथून बोलवून घेत गुरूवारी त्यांच्या नातेवाईकांकडे देण्याची कार्यवाही करण्यात आली. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नरपतगिरी चौकातील राजधानी हॉटेल येथे तीन अल्पवयीन मुली आल्या होत्या. त्या हॉटेलच्या मॅनेजर सुधाकर डांगे यांच्याकडे राहण्यासाठी रूमची मागणी करत होत्या. परंतु त्यांना यामध्ये काहीतरी वेगळा प्रकार वाटल्याने व त्यांच्यासोबत कोणीही वयस्कर नसल्याने त्यांनी समर्थ पोलिसांना याची माहिती दिली.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस उप निरीक्षक रणदिवे व त्याचे पथक हे राजधानी हॉटेल या ठिकाणी पोहोचले. तेथे तीन अल्पवयीन मुली असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांना महिला पोलिस अंमलदारांच्या मदतीने पोलीस ठाण्यास आणण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्या नोकरीच्या शोधामध्ये पुण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्या दिल्लीतून पुणे स्टेशन येथे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आल्या होत्या. तसेच नोएडा सेक्टर 27 अट्टा मार्केट, चक्की गल्ली येथील असल्याचे त्यांनी सांगितले. घरामध्ये कोणाला काहीही न सांगता पुण्याला निघून आल्याचे माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरच्यांबाबत विचारणा केल्यानंतर त्यांची परिस्थितीही बेताची असल्याचे समजले. शहराच्या आकर्षणापोटी आणि नोकरीच्या शोधात पैसे कमविण्यासाठी त्या शहरात आल्याचे माहिती घेताना पोलिसांच्या निदर्शनास आली.
त्यांच्याकडून सर्व माहिती घेतल्यानंतर तिघींना ससून रुग्णालय येथे वैद्यकीय व कोविडची तपासणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंढव्यातील बाल सुधारगृह येथे पाठवण्यात आलेे. तसेच बाल न्याय मंडळ समितीला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार त्या मुलीच्या नातेवाईकांना पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात बोलवून घेण्यात आल्याचे व मुलींना त्यांच्या हवाली करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी सांगितले.
पुणे कंट्रोल रूम येथून दिल्ली पोलीस कंट्रोल रूम यांचा संपर्क क्रमांक प्राप्त करून त्याद्वारे सेक्टर 20 पोलीस स्टेशन ठाणे नोएडा, येथील उपनिरीक्षक नितीन जावला यांना फोन करून माहिती दिली. त्यांनीही सदरच्या तिन्ही मुली मगंळवार सकाळ पासून हरवल्या बाबत त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगितले. त्यातील एका मुलीच्या भावाला याबाबतची माहिती दिली. त्यानुसार तिन्ही मुलींचे नातेवाईक गुरूवारी दुपारी पुण्यात पोहचले. मुलींच्या घरची परिस्थीती बेताची असल्याने व पुण्यासारख्या शहराप्रती असलेल्या आकर्षणातून त्या पुण्यात आल्याचे चौकशीत समोर आले.
– रमेश साठे, वरिष्ठ निरीक्षक, समर्थ पोलिस ठाणे