corona : कोरोना विरोधातील तयारीत कुठलीही घोडचूक नको

corona : कोरोना विरोधातील तयारीत कुठलीही घोडचूक नको
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना ( corona ) विरोधातील तयारींमध्ये कुठलीही घोडचूक होवू नये, यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये परस्पर समन्वय आवश्यक आहे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केले. मांडविया यांनी सोमवारी आभासी पद्धतीने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा आणि केंद्रशासित दादरा-नगर-हवेलीचे आरोग्य मंत्री आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेत कोरोनाविरोधातील तयारींचा आढावा घेतला.

देश सध्या विषम स्थितीचा सामना करीत आहे. कोरोना महारोगराईचा आलेख उंचावताना दिसून येत आहे. अशात कोरोना ( corona ) संसर्गाचे नियंत्रण, व्यवस्थापनासह लसीकरण अभियानाच्या प्रगतीसाठी प्रयत्नरत राहणे आवश्यक असल्याचे मत बैठकीतून मांडविया यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीतील निर्णयाची माहिती मांडविया यांनी राज्यांना दिली.

बैठकीत उपस्थित आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती मांडविया यांना दिली. राज्यात नवीन कोरोनाबाधित, सक्रीय रूग्ण, आठवड्याचा तसेच दैनंदिन कोरोना संसर्गदरासंबंधी देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोना महारोगराईच्या या संकटकाळात आरोग्य सेवांना अधिक मजबूत करण्यासंबंधीचे निर्देश बैठकीतून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचे कळतेय.

देशभरात आरोग्य क्षेत्रातील पायभूत सुविधांना बळकट करण्यासाठी ईपीआरपी योजने अंतर्गत राज्यांना मदत केली जात आहे. योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग करीत राज्यांनी कोरोनाविरोधातील तयारींना वेग देण्याचे निर्देश मांडवियांनी दिले. केंद्राकडे मुबलक माहिती उपलब्ध असावी याकरिता कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध खाटा, पीएसए प्लांट, ऑक्सिजन उपकरणांसारख्या पायाभूत सुविधांच्या स्थितीसंबंधी राष्ट्रीय पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश मांडविया यांनी दिले.

कोरोना ( corona ) संबंधी वास्तविक माहिती, विश्लेषण तसेच सूचना आधारित निर्णयांसाठी पोर्टलवरील माहिती सातत्याने अद्ययावत करण्याच्या सूचना देत औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश दिले. बैठकीत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषीकेश गणेशभाई पटेल, मध्यप्रदेशचे आरोग्य मंत्री डॉ.प्रभुराम चौधरी तसेच राजस्थानचे परसादी लाल मीणा उपस्थित होते.

राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटर अकाउंटवरून त्यांनी सोमवारी यासंबंधी माहिती दिली. 'आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सौम्य लक्षणे आहेत. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घ्यावे आणि तपासणी करून घ्यावी" असे सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याआधी देखील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news