

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्ता वाढ ही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर (7th Pay Commission) आधारित असेल. सध्या कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळतो. बेसिक पगाराची टक्केवारी तसेच वाढती महागाई लक्षात घेऊन DA दिला जातो. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगाराचा हा घटक महागाईपासून दिलासा देण्याच्या उद्देशाने दिला जातो.
महागाई भत्त्यामध्ये शेवटची वाढ मार्चमध्ये करण्यात आली होती. मागील ३१ टक्क्यांच्या तुलनेत मार्चची वाढ ३ टक्के होती. आता ४ टक्क्यांची वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना ३८ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याचा लाभ देशातील ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होईल.
ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार ५६,९०० रुपये आहे त्यांना २१,६२२ रुपये (३८ टक्के) महागाई भत्ता मिळेल. सध्या ३४ टक्के महागाई भत्ता म्हणून १९,३४६ रुपये मिळत आहेत. महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचा पगार २,२७६ रुपयांनी वाढेल. तर वर्षाला सुमारे २७,३१२ रुपये वाढ होईल.
केंद्र सरकारने जुलै २०२१ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए (dearness allowance) आणि डीआर (dearness relief) १७ टक्क्यांवरुन २८ टक्क्यांपर्यंत वाढवला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये डीएमध्ये ३ टक्क्यांची वाढ केली. यामुळे महागाई भत्ता ३१ टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर पुन्हा त्यात वाढ करण्यात आली होती.
हेही वाचा :