

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्रिमंडळाने खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) (एमएमडीआर) कायदा १९५७ मध्ये दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे लिथियम उत्खननाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच लिथियम आणि इतर व्यावसायिक पाच खाणकामांना परवानगी मिळणार आहे. खासगी कंपन्यांनाही आता ६ खनिजांचे उत्खनन करता येणार आहे. याबाबतचे वृत्त CNBC Awaaz ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
लिथियम, बेरिलियम, टायटॅनियम, निओबियम, टॅंटलम आणि झिरकोनियम या खनिजांचा स्पेसटेक उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन्समध्ये उपयोग होतो. २०१४ पासून खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायद्यातील ही पाचवी दुरुस्ती आहे. पूर्वीच्या बदलांमुळे खनिज संसाधनांसाठी ई-लिलाव अनिवार्य करण्यात आला होता आणि कालबाह्य होत असलेल्या खाण लीजांना मुदतवाढ देण्याची तरतूद होती.
आता केंद्र सरकारने लिथियमसह ६ खनिज उत्खननावरील बंदी उठवली आहे. लिथियम खाण व्यवसायाच्या लिलावाच्या प्रस्तावालाही केंद्राने मंजुरी दिली आहे. सरकारने हरित उर्जेचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलले आहे.
आतापर्यंत देशात लिथियम हे प्रतिबंधित कॅटेगरीत होते. त्याचा वापर केवळ राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कामासाठी केला जात होता. यामुळे गेल्या १ वर्षात लिथियम बॅटरीची आयात ५३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लिथियम खाणकामाला परवानगी दिली आहे.
राजस्थानच्या देगाना (नागौर) मध्ये नुकताच एक मूल्यवान लिथियमचा (Lithium Reserves Rajasthan) नवीन साठा सापडला होता. या साठ्याची क्षमता जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडलेल्या साठ्यापेक्षा जास्त आहे.
जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि खाण अधिकार्यांनी असा दावा केला आहे की, हा साठा भारताच्या एकूण लिथियमच्या मागणीपैकी ८० टक्के पूर्तता करणार आहे. या साठ्याच्या शोधामुळे लिथियमसाठी चीनवरील भारताचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते.
लिथियमच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भारत आतापर्यंत चीनवर अवलंबून आहे. मात्र, राजस्थानमध्ये नवीन साठा सापडल्याने चीनची लिथियमचा पुरवठादार म्हणून असलेली मक्तेदारी संपुष्टात येईल आणि आखाती देशांप्रमाणे राजस्थान आर्थिकदृष्ट्या संपन्ना होईल, असे सांगितले जात आहे. (degana rajasthan)
लिथियम हा एक नॉन-फेरस धातू आहे, ज्याचा वापर मोबाईल-लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन आणि इतर चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. लिथियमसाठी भारत पूर्णपणे परदेशी पुरवठ्यावर अवलंबून आहे आणि लिथियम महाग असल्याने त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. आता GSI ला देगाना परिसरात लिथियमचे मोठे साठे सापडले आहेत.
लिथियम हा जगातील सर्वात हलका धातू आहे.
तो चाकूने कापता येतो. पाण्यावर चक्क तरंगतो.
उपयुक्तता : हा धातू रासायनिक ऊर्जा साठवून तिचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो.
लिथियम हा बॅटरीत वापरला जाणारा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे.
घड्याळे, रिस्ट वॉच, लॅपटॉप, मोबाईल फोन अशा सर्वातच हा धातू वापरला जातो.
पांढरे सोने म्हणून याची ओळख आहे.
हे ही वाचा :