भगिनींनो, आरोग्याची हेळसांड थांबवा!

भगिनींनो, आरोग्याची हेळसांड थांबवा!
Published on
Updated on

घरातील स्त्री कुटुंबासाठी राबराब राबते. सगळ्यांच्या सवयींची, दैनंदिनीची, आरोग्याची देखभाल घेते; पण या सगळ्या रामरगाड्यात स्वतःच्या आरोग्याकडे मात्र तिचे दुर्लक्ष होते. याचा परिणाम थकवा येणे, सुरकुत्या येणे यासह विविध प्रकारे आजार जडण्यात होतो. स्वत:साठी थोडा वेळ दिला आणि नियमितता व स्वयंशिस्त पाळली, तर आरोग्य उत्तम राखणे फारसे अवघड नाही.

आठ मार्चला आपणच काय, पूर्ण जगच 'महिला दिन' साजरा करते. याच वर्षी नाही तर दर वर्षी; पण हा एकच दिवस असतो का महिलेचा? स्त्रीचा? वर्षाचे 365 दिवसही तिचेच असतात. तिच्या कामाचे, तिच्या कर्तृत्वाचे, तिचे अपत्यांसाठी झिजण्याचे! ती हे सर्व न सांगता, न चुकता वर्षानुवर्षे करत असते. स्वयंसिद्धाच ती; पण या स्वयंसिद्धेला स्वत:च्या आरोग्याची, स्वास्थ्याची म्हणावी तशी काळजी नसते. नपेक्षा ती घेत नाही. आजकाल नोकरी व्यवसाय करणार्‍याच महिला जास्त आहे. त्यांना एक्सरसाईज होत नाही, तर एक्झर्शन होते. ते टाळण्यासाठी समय नियोजन हे सर्वात महत्त्वाचे. म्हणजे सगळ्या कामाच्या रामरगाड्यातून स्वत:साठी थोडा वेळ देता येईल. दुसरे म्हणजे नियमितता आणि स्वयंशिस्त. शिस्त ही घरातल्या स्त्रीला असली, तर घरातील सगळ्यांनाच लागते.

घरातील सगळे उठायच्या एक तासभर आधी घरातील स्त्री उठली, तर तिला स्वत:साठी वेळ मिळेल. सुरुवातीला जड जाईल; पण एकदा का सवय लागली आणि त्यातले सुख-समाधान, फायदा कळू लागला की, उठण्याचा त्रास वाटेनासा होईल. जाग आल्या आल्याच बिछान्यात हात-पाय ताणण्याचे व्यायाम ती करू शकते. मानेच्या हालचाली, आळस देताना पूर्ण खांद्यापासून हात मागे ताणणे, डोक्याच्या वर नेऊन आळोखे-पिळोखे देणे हा सर्व सांध्यांना, स्नायूंना मोकळा करायचा व्यायाम आहे. सकाळचे आन्हिक आटोपल्यावर चहाला आधण येईस्तोवर उठा-बशा काढणे, हस्त-पाय संचालन करणे. स्वयंपाकघरातीलच हा पण एक सहजसोपा, करता येण्यासारखा व्यायाम आहे आणि फायद्याचा पण! तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीतही! रोज रात्री बदाम किंवा चणे, मूग, मटकी काहीतरी भिजवून सकाळी उठल्यावर खाणे! हे काम तर घरातील 7-8 वर्षांची मुलेही आनंदाने करतात. प्रत्येकी दोन बदाम किंवा चमच्याचे प्रमाण सांगून दिले की, ते मोजून व्यवस्थित पाण्यात टाकतात आणि आठवणीने करतात.

रात्री भिजवलेले बदाम, चणे, वाटाणे, दाणे, मेथी जे काही असेल ते चहाबरोबर खा. त्याबरोबर थोडासा गूळ खा. प्रोटिन्स चण्यातून आणि आयर्न गुळातून मिळतील. तेही भरपूर प्रमाणात! कधी कधी बदल म्हणून शेंगदाणे-गूळ, फुटाणे-गूळ खाल्ले तरी आपला उद्देश सफल होतो. अगदी घरगुती काम करणार्‍या महिलादेखील हे करू शकतात.सकाळी घाईच्या वेळी भाजी-पोळी किंवा जे जमेल ते करा. ऑफिसमध्ये जाताना पर्समध्ये गुळपापडी, शेंगदाण्याचा लाडू ठेवला, तर किती छान! एखाद्या वेळेस कॅडबरी मिल्कबार ठेवलात तरी चालेल. खाल्याखाल्या मात्र पाणी पिणे आवश्यक. दाताला चिकटलेली कोको पावडर हानी करते दातांची! शक्य असेल, तर सुकामेवाही ठेवावा. खारीक एकदम लोहतत्त्वाने भरपूर. शिवाय तत्काळ एनर्जी देणारी! हल्ली स्त्रियांमध्ये अ‍ॅनिमिया खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. अगदी सुखवस्तू घरातील महिलांमध्येही! त्याला कारण खाण्याच्या सवयी! स्वयंपाकाच्या सवयी! अगदी ठरवून रोज एकदातरी लोखंडाच्या कढईत भाजी किंवा वरण करा. लोखंडाच्या कढईत शेंगांची भाजी, वांग्याची भाजी, फोडणीचं वरण, पिठलं, बघा एकदा करून. एकदम सुवर्ण चव येते आणि वर लोहतत्त्वही भरपूर प्रमाणात मिळते.

9-10 तास बाहेर काम करून आल्यावर परत घरी परतून स्वयंपाक करायचा म्हणजे थकवा येतो, कंटाळा येतो, तर एक डिश मेनू बनवा एखाद्या वेळी! मिश्र डाळींची खिचडी, त्यांत भाज्या टाका, डाळी 2-3 प्रकारच्या टाका. मुगाची डाळ सालासकट वापरा. मसूर आणि तूरही चांगली लागते. डाळ-ढोकळी, वरणफळ, कडबोळी किती तरी पदार्थ आहेत. घरी आईंना किंवा आईला विचारा. भरपूर उत्साहाने आणि प्रेमाने करतील. अर्थात काही अपवाद असतातच. ही कडबोळी मिश्र पिठाची करा. त्या पास्त्यापेक्षा किती तरी पटीने चांगली लागतात. शिवाय पौष्टिकही होतात. सातूचे पीठ, मेतकूट हेही असेच चविष्ट, पौष्टिक आणि तत्काळ वापरणारे पदार्थ आहेत. थालीपीठ हेही पूर्ण अन्‍न आहे. बहुतेक सगळेच आवडीने खातात.

अंडी, चिकन चालत असेल, तर रोज अंडी खाल्ली, तर कॅल्शियम आणि प्रोटिन्स दोन्हीचीही गरज भागेल. शिवाय आठवड्यातून एकदा चिकन-मीट घेतले तर चांगले! मासळी पण चांगली! ज्यांना हे चालत नाही, त्यांना कॅल्शियमसाठी दुग्धजन्य पदार्थ, सीताफळ, पेरू, केळी हे कॅल्शियमचा पुरवठा करू शकेल. खूप जणींना दूध आवडत नाही. सीताफळ, पेरू बाराही महिने मिळत नाहीत. केळी मिळतात. एक सोपा उपाय सांगते. कडीपत्ता मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो आणि स्वस्तही आहे. कडीपत्त्याची ताजी पाने तेल न टाकता तशीच भाजून घ्या. छान कुरकुरीत होतात. त्यांची बारीक पूड करा त्यांत आवडीप्रमाणे तीळ भाजून टाका. साधारणत: एक वाटी पूड असेल, तर एक वाटी तीळ घ्या. त्यात चवीपुरते मीठ घालून एकत्र मिश्रण करून घ्या. येता-जाता तोंडात टाकायला हरकत नाही. कडीपत्त्यामध्ये कॅल्शियम, लोह भरपूर असते.

बाकी सगळ्या मौसमी भाज्या, फळे यांचा वापर कराच. तरुण वयातही अनारोग्याचे परिणाम दिसू लागतात. एकदा चाळीशी ओलांडली की, थकवा येणे, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, सुरकुत्या दिसणे, निस्तेज त्वचा, पांढरे आणि निर्जीव वाटणारे केस हे आणि असे दुष्परिणाम दिसू लागतात. तेव्हा छान हवा घ्या. व्यायाम करा, स्वत: सुखी राहा. इतरांनाही सुखी करा!
डॉ. रंजना देशपांडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news