सातारा : पुढारी वृत्तसेवा : नागरिकांना जलदगतीने, वेळेची आणि पैशाची बचत होवून न्याय मागता आला पाहिजे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन केले जावे. हा लढा जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे या लढ्याला पाठिंबा असल्याचे प्रतिपादन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड. गिरीश खडके, सचिव विजयकुमार तोटे व पदाधिकार्यांनी बुधवारी जलमंदिर पॅलेस येथे खा. उदयनराजेंची भेट घेवून चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाल्यास, वकीलांना आणि पक्षकारांना अत्यंत सोयीचे होणार आहे. सध्या पक्षकारांना मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पणजी येथे जावे लागते. 20 वर्षांपासून उच्च न्यायालयाची ही व्यवस्था आहे. सध्या खटल्यांची वाढती संख्या पाहता कोल्हापूर येथे खंडपीठ होणे आवश्यक आहे.
खंडपीठ झाल्यास वकील, पक्षकार यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. न्याय मागणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे खंडपीठ मागणीला माझा पाठिंबा असल्याचे खा. उदयनराजेंनी कृती समितीच्या पदाधिकार्यांना सांगितले. या खंडपीठासाठी आवश्यक त्या गोष्टी करू, अशी ग्वाही खा. उदयनराजेंनी या पदाधिकार्यांना दिली.