गुढी परिवर्तनाची

गुढी परिवर्तनाची

प्रा. शिवाजीराव भुकेले :  गुढी पाडवा सामूहिक एकता व परिवर्तनाचा महामंत्र देणारा सण आहे. आपले संस्कार, जात, वर्ग, द्वेष, मत्सर या सर्व गोष्टींना विसरून जाऊन उत्सवप्रिय भारतीय माणूस गुढी पाडव्याचा सण साजरा करतो.

उभारू गुढीची तोरणे गाऊ चैत्र सख्याचे आनंद गाणे ।
सुष्टी सतीने उभारिली गुढी आम्रपालवी तोरणाने ॥

खरे पाहता चैत्रशुद्ध प्रतिपदा हा भारतीय मनाचा सुखद आध्यात्मिक ठेवा आहे. चैत्रमास अर्थात मधुमासच्या प्रारंभीच गुढी पाडवा येतो आणि मानवी मनात आनंदाची गुढी उभी राहते. चैत्राच्या या तप्त पालवीच्या खेळात कुसुमाकर वसंत जणू काही यौवनाच्या उंबरठ्यावरच पाऊल ठेवतो आणि निसर्गचक्रात परिवर्तनाची गुढी उभी राहते. सृष्टीची काया पिवळ्याधमक उन्हाने उजळून निघते. सृष्टीच्या रंग-बरसातीवर लुब्ध असलेले पक्षीसमूह किलबिलाट करू लागतात. पळस, पांगिरा, गुलमोहर बहरू लागतात. त्यांच्या बहरण्याकडे पाहून मानवाच्या जीर्ण-शीर्ण जीवनेच्छा ताज्या-तवाण्या होतात. अशा या गुढी पाडव्याविषयीच्या धार्मिक ऐतिहासिक, पौराणिक सामाजिक महत्त्वाच्या दृष्टीने काही संदर्भ मिळतात. असे म्हणतात की,

चैत्रमासी जगद ब्रह्मा, संसर्गे प्रथमे हति,
शुक्लपक्षे समग्रते तु तदा सूर्योदयो सनि
प्रवर्तथा मास तथा कालस्य गणनां मीप
तथा कार्य महाशांतीः सर्व कल्मश नाशतिः
सर्वोत्पादप्रशासमिती, कली दुस्वप्न नशिनी 

सृष्टीकर्त्या जगदब्रह्माने चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला समस्त सृष्टीची रचना केली आणि कालगणनेला प्रारंभ केला म्हणून ही तिथी पौराणिकदृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या तिथीला सर्व उत्पादांचा नाश होतो, असे मानले जाते. म्हणून ब्रह्मपूजेबरोबरच कालगणनेची प्रतीके पळे, घटिका, प्रहर, दक्ष, काम्या यांच्याबरोबरच पालनकर्ता म्हणून विष्णूच्या रूपाची पूजा केली जाते आणि माणसातील सृजनशक्तीला जागे करण्याची एक नवी प्रेरणा मिळते. आजसुद्धा भारताच्या ग्रामसंस्कृतीमध्ये पाडव्याच्या पंचांगाचे श्रद्धापूर्वक श्रवण केले जाते आणि नववर्षाचे संकल्प केले जातात. 'क्षणभर आम्ही सोसले वाईट पुढे ही अवीट सुख आहे' या संत वचनाप्रमाणे कडुलिंबाची पाने, जिरे, हिंग, गूळ यांच्या मिश्रणाचा प्रसाद सेवन केला जातो. ज्या पाठीमागे केवळ एक पौराणिक परंपरा नाही तर निरामय आरोग्याचे शास्त्र आहे. ज्या शास्त्रास आम्ही पारखे झाल्यामुळे अनेकांची प्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना 'कोरोना'चे बळी व्हावे लागले.

सणांचा अधिनायक म्हणून गुढी पाडव्याचे महत्त्व द्विगुणीत करण्याचे काम अनेक ऐतिहासिक कथांनी केले आहे. त्यातील अत्यंत महत्त्वाची कथा पैठणच्या शालिवाहन राजाची आहे. प्रतिष्ठान नगरी एक ब्राह्मण कन्या व दोन पुत्र फिरत-फिरत आले. एका कुंभाराने त्यांना आश्रय दिला. पुढे या ब्राह्मण कन्येवर शेष अनुरक्त झाला व त्यांना अपत्यप्राप्ती झाली. हे अपत्य एवढे कर्तृत्ववान निघाले की, त्याने विक्रमादित्याचा पराभव करून त्याला पार नर्मदेच्या पलीकडे पिटाळून लावले आणि प्रतिष्ठान नगरीचा तो स्वतः सम्राट झाला. ज्याने मातीचे सैनिक तयार करून त्यांच्यात प्राण फुंकले. घोर पारतंत्र्याच्या युगात स्वातंत्र्यभावनेची मशाल पेटविली. स्वतःच्या नावाने 'शालिवाहन शक' सुरू केला. आपल्या प्रजेच्या जीवनात परिवर्तनाची गुढी उभी करणार्‍या शालिवाहनाच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुढी पाडव्याला आनंद कंद गुढ्या उभ्या केल्या जातात, तर काही ठिकाणी गुढीच्या कळकाच्या तळाशी मातीच्या सैनिकांचीही मनोभावे पूजा केली जाते.

तसे पाहिले तर गुढी पाडवा सामूहिक एकता व परिवर्तनाचा महामंत्र देणारा सण आहे. आपले संस्कार, जात, वर्ग, द्वेष, मत्सर या सर्व गोष्टींना विसरून जाऊन उत्सवप्रिय भारतीय माणूस गुढी पाडव्याचा सण साजरा करतो. या सृष्टीची उत्पत्ती नेमकी कशी झाली? खरंच, शालिवाहनाने मातीच्या सैन्यांत प्राण फुंकले का? गुढी पाडव्याला पाणपोई उघडल्यास सद्गती प्राप्त होते का? या सार्‍या ऐतिहासिक व पौराणिक कथांच्या बाबतीत विद्वान मंडळींमध्ये अनेक वाद-विवाद आहेत; पण सामाजिक नीतिमत्ता, सत्त्वशील समाजाची निर्मिती, निर्मत्सर भावनेचे चालते कल्पतरू निर्माण करणारा आनंद कंद गुढी पाडवा या भावनेने पाडव्याकडे पाहण्यास काय हरकत आहे? जुन्या झालेल्या कालबाह्य गोष्टी विसरून जाऊन नव्या नवलाईची प्रेरणा देणे व ज्या जुन्या सांस्कृतिक मूल्यांमुळे नवपरिवर्तनाची गुढी उभी राहते. अंधारात चाचपडणार्‍या सामान्य माणसाला आशेचा किरण दिसतो. सांस्कृतिक मूल्यांच्या पुनर्जागरणाचा एक नवा मंत्र मिळतो. सांस्कृतिक जागरणाचा एक उत्सव याबरोबरच विवेकीदृष्टीने गुढी पाडव्याच्या सांस्कृतिक मूल्य संदर्भाकडे पाहणे गरजेचे आहे.

जैसी दीकळीका धाकुटी ।
परि बहु तेजाते प्रकटी ।
तैसी सद्बुद्धि ही धाकुटी । म्हणो नये ॥

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news