भंडारा : रूग्‍णवाहिका चालकाची आत्‍महत्‍या; ५ महिन्यापासून पगार न मिळाल्‍याने उचलले पाऊल | पुढारी

भंडारा : रूग्‍णवाहिका चालकाची आत्‍महत्‍या; ५ महिन्यापासून पगार न मिळाल्‍याने उचलले पाऊल

भंडारा ; पुढारी वृत्‍तसेवा पाच महिन्यापासून पगार मिळाला नसल्याने नैराश्येत गेलेल्या एका कंत्राटी रुग्णवाहिका चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवार) पवनी तालुक्यातील कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सदनिकेत उघडकीस आली. विक्की उर्फ विकास मुकुंदा मेश्राम (वय २२) असे मृत चालकाचे नाव असून तो मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव येथील रहिवासी आहे. सध्या तो कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होता.

घटनेतील मृतक विक्की मेश्राम याला काही महिन्यापासून पगार मिळाला नव्हता. शिवाय ठेकेदाराकडून त्याला त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून ३० मार्च रोजीच्या रात्री कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सदनिकेत विक्कीने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी १ एप्रिल रोजी घटनेची नोंद केली आहे. तपास पोलिस हवालदार सुभाष मस्के करीत आहेत.

माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना २४ तास कर्तव्यावर हजर राहावे लागते. त्या तुलनेत त्यांना मिळणारा पगार अत्यल्प असतो. कमी पगार असला तरी नियमित पगार मिळत नसल्याने अनेक कंत्राटी रुग्णवाहिका चालक नैराश्येत आहेत. काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात एका कंत्राटी रुग्णवाहिका चालकाने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता.

Back to top button