कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हिवरखेडा नांदगिरवाडी येथील एका शेतकर्याच्या शेतात नवीन कनेक्शनसाठी तारांची जोडणी करताना विजेचा धक्का बसून चार तरुण मजुरांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी दुर्घटना शुक्रवारी (दि. आठ) दुपारी घडली. चारही तरुण तालुक्यातीलच नावडी गावातील आहेत. गणेश कारभारी थेटे (35), भारत बाबुराव वरकड (35), जगदीश मुरकुंडे( 40), अर्जुन वाळू मगर (26) अशी मृतांची नावे आहेत.
कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम भालेराव यांनी सांगितले की, औरंगाबादच्या अनुकूल पॉवर कंपनीने बानोबी रतीब पठाण (गट नं. 52) यांच्या शेतात वीज जोडणीचे काम घेतले होते. हिवरखेडा व नांदगीरवाडी या गावापासून सुमारे एक ते किमी अंतरावर बानोबी रतीब पठाण यांचे डोंगरावर शेत आहे. या शेतात वीज खांब व वीज जोडणीचे काम अनुकूल कंपनीने हे काम एका गुत्तेदाराला दिले. या गुत्तेदाराने हे काम नावाडी येथील या मजुरांना दिले.
या शेताजवळ मकसूद पठाण यांचे शेत आहे. या शेतकर्याने पपईची फळबाग केली असून या फळबागेला रानडुकरांचा उपद्रव असतो. त्यासाठी शेताच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. वरील चार मजूर विजेच्या तारा ओढत- ओढत पपईच्या फळबागेच्या शेताजवळ आले. या तारा पपईच्या बागेच्या कुंपणावरील विद्युत प्रवाह सोडलेल्या तारांवर पडताच चारही मजुरांना जोराचा विजेचा धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम भालेराव, बीट जमादार सतीश खोसरे, पोलिस ना. संजय आटोळे,नावडीचे किशोर मुरकुंडे, अरुण गायके, दिलीप गिलबिले, नवनाथ आघाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध रुग्णवाहिकेतून एकच मृतदेह आणता आला.
उर्वरित तिघांचे मृतदेह रिक्षात आणावे लागले. चारही मृतदेह कन्नड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. येथे संतप्त नातेवाईक, ग्रामस्थ यांनी संबंधित गुत्तेदार, शेतकरी, विद्युत अभियंता यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा यासाठी ठिय्या मांडला होता. मृत जगदीश मुरकुंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
भारत वरकड यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, वडील असा परिवार आहे. अर्जुन मगर हे अविवाहित आहेत. त्यांच्या वडिलांचे निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. गणेश थेटे यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई, वडील असा परिवार आहे. ते एकुलते एक होते.
बाळू कारभारी थेटे (रा. नावडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनुकूल पॉवर कंपनीचा ठेकेदार, तसेच मुकंद भास्करराव सोबने (सुपरवायझर रा. गजानन नगर, औरंगाबाद), महावितरणचा सहायक शाखा अभियंता नाथा जाधव, मकसूद मानखाँ पठाण (रा. हिवरखेडा नांदगिरवाडी), वायरमन हिवाळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मकसूद पठाणने शेताच्या कुंपणात वीज सोडली होती. पुढील तपास सहायक पो. नि. टी .आर. भालेराव हे करत आहेत.
हेही वाचलंत का?