

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : देगाव रोड येथील हब्बु वस्ती येथील जगताप हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या बिस्मिल्ला शेख यांचे घराला साधारणपणे रात्री 8:30 वाजता आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाने त्वरित होटगी नाका येथील दोन बंब घटनास्थळी पाठवून दिले. त्यानंतर सदर आग आटोक्यात आणण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार, आग चिमणीच्या भडक्याने लागली असावी असा अंदाज लावला जात आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण घर जळून खाक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठी वित्तीय हानी झाली आहे. घरी वीज कनेक्शन नाही, त्यामुळे ही महिला रोज रात्री चिमणी लावते. चिमणी लावून चुलीवर स्वयंपाक करताना चिमणी खाली पडून भडका उडाला अशी माहिती समोर आली.
घटनास्थळी फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी बघ्यांची झालेली गर्दी कमी करून वृद्ध महिलेबद्दल अधिक माहिती घेतली.
घर मालक बिस्मिल्ला शेख या एकट्याच घरात राहतात. त्या अत्यंत गरीब असून या आगीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.