सेलू : पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या ध्वजारोहणप्रसंगी रविवारी (दि. १७ सप्टेंबर) रोजी सेलू (जि. परभणी) येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम्' मानवी रांगोळी साकारली. या रांगोळीतून हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करीत त्यांना अभिवादन केले.
संबधित बातम्या
हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील प्रमुख केंद्रांपैकी परभणी जिल्ह्यातील सेलू येथील नूतन विद्यालय ही राष्ट्रीय शाळा एक महत्त्वाचे केंद्र होते. शाळेतील शिक्षकांचे मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात आणि वंदेमातरम् चळवळीत मोठे योगदान राहिलेले आहे. याची देखील आठवण अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांमधून मांडली गेली.
याच पार्श्वभूमीवर संस्थेचे माजी चिटणीस प्राचार्य द. रा. कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कलाशिक्षक रामकिशन कटारे, बाबासाहेब हेलसकर, क्रीडा शिक्षक गणेश माळवे, डी. डी. सोन्नेकर, प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ८५ फूट लांब, २६ फूट रुंदीची ' वंदेमातरम् ' मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्याध्यापक नारायण सोळंके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, प्रकाशचंद बिनायके, राजेश गुप्ता, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, अजीज खाँ पठाण, संतोष पाटील, किरण देशपांडे, आरती पांडव, सहसचिव वैजनाथ मोळे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रीय खेळाडू राहुल घांडगे, बबलू घांडगे, विशाल ढवळे, अजय चव्हाण, ज्ञानदीप घांडगे, नकुल वानखेडे, प्रथमेश नरवडे, गोविंद जमरे, आर्यन गायके, सुदर्शन भुजबळ, गौरव मगर, पवन कव्हळे, आदित्य लाटे, सार्थक लाटे आदींनी ही रांगोळी साकारण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक व कर्मचार्यांची उपस्थिती होती.
शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचे अग्रणी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ आणि दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या प्रतिमा, तत्कालीन हैदराबाद संस्थानाचा नकाशा आणि मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभाची प्रतिकृती लक्षवेधी ठरली. अरुण रामपूरकर, दीपक देवा, भालचंद्र गांजापूरकर, अशोक लिंबेकर यांनी ही रचना साकारली होती.
हेही वाचा :