

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला. त्यात 'संभाजीनगर' हा विषय नव्हता, असा काही प्रस्ताव चर्चेला घेण्यात येणार आहे, याबाबतची कोणतीही माहिती आम्हाला नव्हती, शेवटच्या कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला, त्याच्याशी आमच्याशी सुसंवाद झाला नाही, हा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला याबाबत कळले, मात्र संभाजीनगर या प्रश्नापेक्षा इतर काही गोष्टी केल्या असत्या तर औरंगाबादकरांना आनंद झाला असता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (दि.१०) पत्रकार परिषदेत सांगितले.
(Sharad Pawar) ठाकरे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत पवार म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या कामाची पद्धत असते, यामध्ये मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा अंतिम असतो. त्याबाबत तेथे मतदान घेण्यात येत नाही, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत तेथे काहींनी मत व्यक्त केले, त्यातील काही लोक माझ्याजवळ बसले आहेत. त्यांचा निर्णय हा मंत्रिमंडळाचा असतो. मात्र किमान समान कार्यक्रमाचा हा भाग नव्हता, हे खरं आहे. पण हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा अंतिम निर्णय असतो ही वस्तुस्थिती आहे. पक्षाच्या व्यासपीठावर याबाबत अद्याप चर्चा झाली नाही. चर्चा केल्यानंतर या विषयावर भूमिका घेतली जाईल. मंत्रिमंडळाच्या निर्णयात सगळे होतो, हे तितकेच खरे आहे. या शहरांच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
आगामी विधानसभेच्या निवडणुका या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षाने एकत्र लढाव्या, अशी माझी व्यक्तिगत मनस्थिती आहे, मात्र या संदर्भात मी काँग्रेस, शिवसेना किंवा माझ्या पक्षातील कुणाशीही बोललेलो नाही, असे निर्णय एकाने घ्यायचे नसते, ही प्रक्रिया अद्याप आमची सुरु झालेली नसल्याचे पवार यांनी सांगितले.
राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असे मी बोललोच नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. राज्यात अडीच वर्षात निवडणुका होणार आहेत, शेवटचे सहा महिने निवडणुकांचे वातावरण असते. त्यामुळे येणारी दोन वर्षे पक्षाने कामाला लागले पाहिजे, असे मी सांगितले असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार हे नास्तिक असल्याची चर्चा होते. त्यामुळे तुम्ही आज आषाढीचा उपवास केला आहे का ? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, मी आज उपवास केला आहे आणि सकाळी भगर खाल्ली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री म्हणून मी चारदा पुजेला गेलो. अस्तिक की नास्तिक असा प्रश्न माझ्या बाबतीत विचारला जातो. माझे विचार वेगळे असले तरी, जे लोक जातात, त्यांचा आदर सन्मान ठेवण्यासाठी मीही पुजेला जात होतो, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी आजारी असतानाही राज्याची जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी अनेकदा बैठक घेतल्या, मंत्रिमंडळात चर्चा केली. मात्र, याचा त्यांनी गाजावाजा केला नाही, असेह पवार म्हणाले.
हेही वाचलंत का ?