नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा : पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौक ते रामकृष्ण चौक येथील रस्त्यावर दुतर्फा बाजूस रस्त्याच्या कडेला पदपथाला लागून रस्त्यावर वाहने पार्क होत आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून येथील रस्त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. रस्त्याच्या कडेला पदपथ तयार करण्यात आले. मात्र, येथील रस्त्याच्या कडेला अनधिकृतरित्या बेशिस्तपणे दुतर्फा बाजूस वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे सांगवी वाहतूक पोलिस विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
येथील परिसरात दुतर्फा बाजूस अंतर्गत रस्ते आहेत. रस्त्याच्या कडेला पदपथाला लागून बेशिस्तपणे वाहने पार्क केल्यामुळे अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येत असताना मुख्य रस्त्यावरील येणारी जाणारी वाहने दिसून न आल्यामुळे अपघात घडून येत आहेत. गेल्या सहा महिन्यात याच रस्त्यावर 19 वर्षीय मुलाचे तसेच 31 वर्षीय मुलाचा अपघात घडून जागेवरच मृत्यू झाला होता. याव्यतिरिक्त अनेक किरकोळ अपघातही घडून आले आहेत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
येथील रस्त्याच्या दुतर्फा बाजूस पी 1, पी 2 फलक वाहतूक विभागाकडून लावण्यात आले आहेत. मात्र वाहन पार्क करणारे वाहन चालक बेशिस्तपणे वाहने पार्क करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. सांगवी वाहतूक विभागातील वाहतूक पोलिस येथील ठिकाणी बेशिस्तपणे वाहने पार्क करणार्या वाहन चालकांवर कारवाई करीत नसल्याने दिवसेंदिवस वाहन पार्क करणार्यांचे फावले आहे. इतकेच नव्हे तर याठिकाणी महिनोनमहिने धूळ खात पडलेली तर भंगार अवस्थेत असलेली वाहने देखील रस्त्याकडेला आढळून येत आहेत.
काटे पुरम चौक ते रामकृष्ण चौक येथे बाजारपेठ, खाद्यपदार्थ विक्रेते, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, टोलेजंग इमारती, सोसायट्या, नगरे, शाळा, क्लासेस, हॉस्पिटल, कार्यालये, शासकीय इमारती आदी असल्याने येथील रस्त्यावर सतत वाहतुकीची वर्दळ सुरू असते. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक अनेकदा पदपथ सोडून रस्त्यावरून पायी चालताना, रस्ता ओलांडताना रस्ता अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आणखी एखादा अपघात घडून जीव गेल्यावरच वाहतूक पोलिस याकडे लक्ष केंद्रित करणार आहेत का? असा सवाल येथील परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी येथील रस्त्यावरील पी 1, पी 2 नियमांचे उल्लंघन करून वाहतूक पार्क करणार्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दररोज कारवाई होत होती. त्यामुळे वाहतुकीची शिस्त पाळली जात होती. येथील रस्त्यावर वाहन चालकांना सुरळीत रित्या वाहन चालविता येत होते. मात्र ही कारवाई गेली तीन महिने वाहतूक पोलिसांकडून होत नसल्याने अनेक वाहनचालक आपली वाहने बेशिस्तपणे पदपथाला लागून पार्क करीत आहेत.
हेही वाचा