नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत वेळोवेळी जलस्त्रोतांची स्वच्छता केली जाते. त्यानंतरही नोव्हेंबरअखेरच्या अहवालातून जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील २७ जलस्त्रोत दुषित आढळले आहेत. त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत पावसाळा व पावसाळ्यानंतर सर्व तालुक्यांमध्ये पाणी नमुने तपासणीचे सनियंत्रण करण्यात येत असते. यामध्ये दुषित पाणी व ब्लिचिंग पावडर यांचे नमुने आढळणाऱ्या ग्रामपंचायती तसेच पंचायत समिती यांना नोटीस बजावण्यात येते. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण वर्षातून दोन वेळा केले येते. अभियानात केलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायतींना लाल कार्ड, पिवळे कार्ड, हिरवे कार्ड वितरीत करण्यात येते. लाल व पिवळे कार्ड प्राप्त ग्रामपंचायत स्त्रोतांच्या त्रुटीमध्ये सुधारणा करून हिरवे कार्डात रुपांतर करण्यात येत असते.
नोव्हेंबरअखेरच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सिन्नर, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, देवळा, सुरगाणा, चांदवड आणि नांदगाव तालुक्यामधील जलस्त्रोतांचे नमुने तपासण्यात आले होते. यामध्ये सुरगाणा तालुक्यातील २२७ पैकी चार, मालेगाव तालुक्यातील १५४ पैकी सहा, त्र्यंबकेश्वरमधील १४० पैकी चार, देवळ्यामधील ८६ पैकी दोन, नांदगावमधील ८५ पैकी एक, चांदवडमधील ६७ पैकी एक आणि सिन्नरमधील ६४ पैकी नऊ स्त्रोत दुषित आढळले आहेत.
जलस्त्रोतांची नियमित तपासणी केली जाते. यामध्ये जेथे दुषित नमुने आढळलेत त्या ठिकाणी तत्काळ कार्यवाही केली जात आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्या समन्वयातून कार्यवाही केली जात आहे.
– दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
हेही वाचा :