नाशिक : सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित 53 व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात सत्कारार्थींसमवेत मान्यवर साहित्यिक. (छाया : रुद्र फोटो)
नाशिक : सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित 53 व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात सत्कारार्थींसमवेत मान्यवर साहित्यिक. (छाया : रुद्र फोटो)

नाशिक : सावाना साहित्यिक मेळाव्यात भाषाविषयक विचारमंथन

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित 53 व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात रविवारी (दि. 2) नामवंत साहित्यिकांनी त्यांचे विचार मांडले. तसेच यावेळी विविध विषयांवर विचारमंथनही झाले.

सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यात सकाळच्या सत्रात लेखिका वंदना अत्रे यांनी 'कुठे आहे नाशिकच्या सांस्कृतिक मातीचा सातबारा' या विषयावर विवेचन केले. व्यासपीठावर कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रदीप निफाडकर, उद्घाटक संजय वाघ, सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्याध्यक्ष गिरीश नातू, सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर आदी उपस्थित होते.
वंदना अत्रे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासह नाशिक शहराचा इतिहास, परंपरा दुर्लक्षित असून, त्याचे प्रतिबिंब अद्यापही साहित्यात उमटू शकलेले नसल्याची खंत व्यक्त केली. साहित्य, नाटक, चित्रपट, नृत्य यातून नाशिक शहराची परंपरा जोमदारपणे मांडण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. दुपारच्या सत्रात चंद्रकांत वर्तक स्मृती परिसंवादात 'नवीन पिढीच्या मिश्र भाषेमुळे मराठीचा दर्जा खालावला आहे' या विषयावर प्रा. अनंत येवलेकर यांनी विचार मांडले. आशयद्रव्य हरवत चालले असताना व्यक्त होण्यासाठी दुसरीही भाषाही चालते. मात्र, मराठीवर प्रेम ही ठरवून करण्याची गोष्ट आहे. मिश्र भाषा ही स्वीकारार्ह, भूषणावह नसल्याचे ते म्हणाले. परिसंवादाचे समन्वय डॉ. सुनील कुटे यांनी केले. वैद्य विक्रांत जाधव यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी सूत्रसंचालन केले. दोन दिवसीय या मेळाव्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

मान्यवरांचा सत्कार :
मेळाव्यात दुपारच्या सत्रानंतर मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये गोरखनाथ पालवे (प्रथम), रतन पिंगट (द्वितीय), सीमा आडकर (तृतीय) यांना कवी गोविंद काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. किरण भावसार व दीप्ती जोशी (प्रथम विभागून), जयश्री कुलकर्णी (द्वितीय) यांना डॉ. अ. वा. वर्टी कथा पुरस्कार, तर नंदकिशोर ठोंबरे यांना चंद्रकांत महामिने विनोदी कथा पुरस्कार, प्रशांत केंदळे यांना जयश्री पाठक कवितासंग्रह पुरस्कार, विजया पाटील (दिवंगत प्रा. डॉ. राहुल पाटील यांच्यासाठी) यांना लक्ष्मीबाई टिळक बालसाहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news