नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील
कादवाच्या खोऱ्यातून
तालुक्यात लहान-मोठी सहा धरणे असल्याने शेतीसाठी बारमाही पाण्याची व्यवस्था आहे. येथील शेतकरी अतिशय कष्टाने व सतत बदलत्या वातावरणावर मात करून विविध प्रकारे पिके घेतात. मात्र, भाजीपाला पिकाला समाधानकारक दर मिळत नसल्याने बळीराजासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे.
बळीराजाने खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामात घेतलेल्या सर्व पिकांना बाजार मातीमोल मिळाल्यामुळे सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी लागणाऱ्या भांडवलाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सतत नैसर्गिक आपत्तीशी समना करताना शेतकरी वर्ग निसर्गापुढे हतबल झाला असून, पिकांना बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतात कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे वातावरणात सतत बदल होत असल्याने भाजीपाला पिकांवर या वातावरणाचे विपरित परिणाम होताना दिसत आहेत. या वातावरण बदलामुळे रासायनिक खते व औषधांचा खर्च वाढत असून, त्या तुलनेत बाजारभाव नसल्याने शेतकरी वर्ग दिवसोंदिवस मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होताना दिसत आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टी, महापूर, तर कधी परतीच्या पावसाने घुमाकूळ घालून सोयाबीन, मका, पोळ कांदा तसेच टोमॅटो पिकांची संपूर्णपणे वाट लावली. त्याचीच पुनरावृत्ती मार्च व एप्रिल महिन्यांत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट होय. त्यामुळे द्राक्ष, कांदा, गहू, टोमॅटोसह सर्वच पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने बळीराजासमोर मोठे संकट उभे राहिले. त्यात कर्जबाजारीपणा वाढत गेल्याने कर्ज कसे भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कर्जवसुली थांबलेली नसून, बॅंकांच्या थकीत कर्जदारांना जमीन जप्तीच्या नोटिसा, बांधावर जमीन जप्त केल्याचे फलक हे सर्व प्रकार सुरू असल्यामुळे बळीराजा संकटात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मात्र, राज्य व केंद्र सरकारने बळीराजाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा सूर सध्या शेतकरी वर्गाकडून ऐकू येत आहे. जगाचा पोशिंदा संकटात असताना सरकारने डोळेझाक करणे म्हणजे कुठेतरी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
व्यापारी मालामाल, शेतकरी कंगाल
दिंडोरी तालुक्यात प्रत्येक ऋतुचक्रानुसार उन्हाळी, हिवाळी व पावसाळी या हंगामानुसार भाजीपाला लागवड केली जाते परंतु गेल्या दोन वर्षांपासून सर्वच पिकांमध्ये भांडवल निघत नसल्यामुळे शेतकरी वर्गाची निराशा होताना दिसत आहे. तर दुसरीकडे हा भाजीपाला व्यापारी शेतकरी वर्गाकडून खरेदी करून बाजारात मोठ्या प्रमाणात नफा मिळवताना दिसत आहेत. त्यामुळे बळीराजाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असून व्यापारी वर्ग मोठा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कांदा, द्राक्ष व टोमॅटोसह सर्व भाजीपाला पिकाला मातीमोल बाजार मिळत असल्यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे.