पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशखिंड, शिवाजीनगर परिसरात मेट्रो व उड्डाणपुलासाठी रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. जेसीबीद्वारे सुरू असलेल्या या खोदकामात गेल्या 20 दिवसांमध्ये तब्बल 36 ठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तुटल्या. यामुळे सदाशिव पेठ, नारायण पेठ, शिवाजीनगर, गणेशखिंड परिसरातील सुमारे 19 हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर महावितरणला आतापर्यंत वीजविक्रीमध्ये सुमारे 17 लाख 16 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, वीजग्राहकांचा रोषदेखील सहन करावा लागत आहे.
संचेती हॉस्पिटल ते विद्यापीठ रस्त्याबाजूच्या भूमिगत वीजवाहिन्यांमधून सदाशिव पेठ, नारायण पेठ, लक्ष्मी रोड, मॉडेल कॉलनी, रेंज हिल्स रोड, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, अशोकनगर, साखर संकुल, वाकडेवाडी, एफसी रोड, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसर, सिमला ऑफीस, हर्डीकर हॉस्पिटल, आकाशवाणी, कासारवाडी या परिसरातील सुमारे 19 हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. गेल्या 20 दिवसांमध्ये रस्ता रूंदीकरणाच्या खोदकामामध्ये 36 ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तुटल्या आहेत.
एकाच दिवशी तब्बल 6 ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्याचे प्रकार घडले आहेत. गंभीर बाब म्हणजे, रस्ता रुंदीकरणासाठी भूमिगत वीजवाहिन्या स्थानांतरित करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात आली होती. मात्र अस्तित्वात असलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांवरच रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. खोदकामात वारंवार नुकसान झालेल्या व जोड दिलेल्या वीजवाहिन्या भविष्यात नादुरुस्त झाल्यास वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या रस्त्याखाली दबलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती सततच्या वाहतुकीमुळे अतिशय अवघड होईल आणि पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देताना मोठ्या कालावधीसाठी वीज खंडित राहू शकेल, अशी स्थिती आहे. यामुळे ग्राहकांसोबतच महावितरणलादेखील मोठा फटका बसणार आहे.
रस्ता रुंदीकरणात जमिनीवरील वीजयंत्रणेमधील केवळ फिडर पिलर स्थानांतरित करण्यात येत आहेत. मात्र, भूमिगत वाहिन्या 'जैसे थे' ठेवून रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. खोदकामात वारंवार तुटलेल्या वाहिन्यांना तात्पुरता जोड दिला जात आहे. त्या वाहिन्या रस्त्याखाली दाबल्या जात आहे. रस्त्याखाली दाबलेल्या या कमकुवत वीजवाहिन्यांमुळे गणेशखिंड, शिवाजीनगर, सदाशिव पेठ, नारायण पेठ, लक्ष्मी रोड या परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होण्याचा धोका आहे. खोदकामात तुटलेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच पर्यायी वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचार्यांना रात्री-बेरात्री धावपळ करावी लागत आहे. पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध न झाल्यास काही ठिकाणी दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित राहत आहे.
हेही वाचा