

औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ भारत, सुंदर भारत यासाठी प्रदूषणमुक्तीचे स्वप्न उराशी बागळून औरंगाबाद शहरातील एक ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक सायकल भ्रमंतीवर निघाले आहेत. औरंगाबाद ते ओमकारेश्वर ते पुन्हा औरंगाबाद असा तब्बल साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. सिडको कार्यालयातील निवृत्त क्षेत्रीय अधिकारी दिनकर भिकाजी बिरारे असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. शहरातील टिव्ही सेंटर, हडको एम-2 या त्यांच्या निवासस्थानापासून शुक्रवारी (दि.३०) सकाळी ७ वाजता ते सायकलस्वारीने ओमकारेश्वर अमरकंटक परत ओंकारेश्वर ते औरंगाबाद अशी साडेतीन हजार कि.मी.ची नर्मदा परिक्रमा करण्यासाठी रवाना झाले.
दररोज १०० किलोमीटर सायकल चालवायचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. प्रवासावर निघताना बिरारे म्हणाले, मला धावणे, पोहणे, सायकलिंगचा छंद आहे. योगामुळे मी ६६ व्या वर्षीं निरोगी आयुष्य जगत आहे. आपला देश प्रदूषणमुक्त आणि तरुण पिढी निरोगी, निर्व्यसनी राहावी. यासाठी सायकल प्रवासातून जनजागृती करणार आहे. सायकल, स्लीपिंग बॅग, दोन कपडे, पाणी बॉटल इत्यादी साहित्य सोबत घेतले आहे. सकाळी घरची मंडळी, नातेवाईक, मित्रांनी मोठ्या आनंदाने शुभेच्छा देत त्यांना रवाना केले.
एवढ्या दूरचा प्रवास ते सायकलवर एकट्याने करणार ही माझ्यासाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांच्या पत्नी म्हणाल्या. आजपर्यंत केलेल्या चांगल्या कामामुळे ते नक्कीच नर्मदा परिक्रमेचा प्रवास यशस्वी पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचलंत का?