पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्याच्या कार्यालयावर हल्ला | पुढारी

पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्याच्या कार्यालयावर हल्ला

पुणे/ वानवडी; पुढारी वृत्तसेवा : हडपसर सय्यदनगर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख इम्तियाय शेख यांच्या कार्यालयात घुसून गुंडांनी गोळीबार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबार प्रकरणात वानवडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक इकबाल शेख (३७), सादिक शेख (25) आणि हुसेन मुस्तफा कादरी (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) या सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख इम्तियाय शेख यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख आहेत. २७ डिसेंबर रोजी शेख यांचा भाऊ इम्रान आणि आरोपी सादिक शेख यांची किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. याच भांडणाचा बदला घेण्यासाठी तिघेजण गुरुवारी सायंकाळी पिस्तुल घेऊन शेख यांच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात शिरले. त्यांनी शेख यांच्या बंद असलेल्या कार्यालयावर लाथा मारून आत घुसण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी खाली जाऊन गजबजलेल्या या परिसरात गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करत आहेत. एकीकडे कोयत्याचा वार आणि गोळीचा बार पुणेकरांना सातत्याने अनुभवास मिळत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरत आहे. फिर्यादी शेख यांनी देखील आरोपींवर आता मोक्का सारख्या कडक कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Back to top button