पंजाब विधानसभेच्या रणांगणात २२ शेतकरी संघटना एकत्र उतरणार - पुढारी

पंजाब विधानसभेच्या रणांगणात २२ शेतकरी संघटना एकत्र उतरणार

चंदिगड; वृत्तसंस्था : विधानसभा निवडणुकांपूर्वी पंजाब मधील राजकारणात दिल्लीतील सिंघू बॉर्डरवरील आंदोलकांनी (कृषी कायदेविरोधी) खळबळ उडवून दिली आहे. यशस्वी आंदोलनानंतर परतलेल्या 32 पैकी 25 शेतकरी संघटनांनी संयुक्‍तपणे निवडणुकीच्या मैदानात ‘एन्ट्री’ केली आहे.

पंजाब विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी या संघटनांनी मिळून संयुक्‍त समाज मोर्चाची स्थापना केली आहे. बलबीर सिंग राजेवाल हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील. चंदिगडमधील बैठकीनंतर शेतकरी संघटनांनी ही घोषणा केली.

शेतकरी नेते हरमित कादिया म्हणाले, की विविध विचारप्रवाहांच्या लोकांनी मिळून संयुक्‍त किसान मोर्चाची स्थापना झाली होती. पंजाबला आम्ही परतलो तेव्हा आमच्याकडून लोकांच्या अपेक्षा बळावल्या आहेत, हे आम्हाला दिसले आणि आम्ही निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. दिल्ली मोर्चावर आम्ही यशस्वी होऊ शकतो तर पंजाबातही सुधारणा घडवून आणू शकतो, हा विश्‍वासही अर्थातच या निर्णयामागे आहे. आणखी तीन शेतकरी संघटना आमच्यासोबत लवकरच येतील, असेही ते म्हणाले.

चढुनी एक मोठी चिंता ( पंजाब )

पंजाबातील शेतकर्‍यांच्या या संयुक्‍त समाज मोर्चा आघाडीसमोर हरियाणातील शेतकरी नेते गुरुनाम सिंग चढुनी यांचे आव्हान असेल. कारण त्यांनीही पंजाबातील निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. संयुक्‍त संघर्ष पक्षाची स्थापना करण्याची घोषणा चढुनी यांनी केली असून, ‘मिशन पंजाब’ असे पर्यायी नावही त्याला दिले आहे. चढुनी यांना शेतकरी आंदोलनाचा लाभ होऊ शकतो, हा कयास बांधूनच राज्यातील शेतकरी संघटनांनीही राजकीय पक्षाची ही मोट बांधली आहे. निवडणुकीच्या राजकारणात शेतकरी संघटनेत अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता त्याने बळावली आहे.

आम आदमी पक्षासमवेत चर्चा ( पंजाब )

आम आदमी पक्षासोबत युती करण्यासंदर्भात संयुक्‍त समाज मोर्चाची चर्चाही सुरू झालेली आहे. राजेवाल आणि कादिया थेट आम आदमी पक्षाच्या तिकिटावरही निवडणूक लढू शकतात, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.

 

Back to top button