सांगली ः बँकेच्या अध्यक्षपदासाठी होणार मोठी रस्सीखेच | पुढारी

सांगली ः बँकेच्या अध्यक्षपदासाठी होणार मोठी रस्सीखेच

सांगली ः पुढारी वृत्तसेवा

जिल्हा बँकेत पुढील पाच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता राहणार आहे. तसा कौल मतदारांनी दिला आहे. निकालानंतर आता अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. मात्र महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख पालकमंत्री जयंत पाटील हे त्यांचा मतदारसंघ सेफ झोन करून तसेच जिल्ह्यावर आपली कमांड राहावी, अशाच व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड करतील, अशी चर्चा आहे.

बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी 9, काँग्रेस 5, शिवसेना 3 अशा 17 जागांवर महाआघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.

विद्यमान संचालक आमदार मानसिंगराव नाईक बिनविरोध निवडून आले आहेत. ते अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना काही वर्षे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे ठरले होते. मात्र बर्‍याच नाट्यमय घडामोडी घडूनही त्यांना ती संधी मिळाली नाही. त्यामुळे आमदार नाईक यांनी आतापासूनच अध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.

अध्यक्षपदासाठी ते प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जाते. तसेच बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांचे नाव पुन्हा अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. त्यांनी गेल्या पाच वषार्ंत बँकेत अनेक धाडसी निर्णय घेतले. तसेच ना. पाटील यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी आहेत.

तसेच पालकमंत्री यांच्या मतदारसंघात त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क आहे. त्यामुळे पुन्हा किमान एक वर्ष तरी पाटील यांना संधी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे.अ‍ॅड. चिमण डांगे यांचेही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. बेरजेचे राजकारण करण्यासाठी इच्छुकांना एक-एक वर्ष संधी मिळू शकते.

काँग्रेसने पाच जागांवर विजय मिळवल्याने उपाध्यक्षपदासाठी आग्रह राहणार आहे. उपाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, मोहनराव कदम, महेंद्र लाड यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेने यंदा पहिल्यांदा तीन जागेवर विजय खेचून आणला आहे. त्यामळे आमदार अनिल बाबर यांना उपाध्यक्षपदाची संधी देण्यासाठी शिवसेना आग्रही राहण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे.

Back to top button